
मुंबई : ‘डॉक्टर्स डे’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना देव मानलं जातं, कारण ते रुग्णांचे प्राण वाचवतात. मात्र, कधी कधी अर्धवट ज्ञान, अपुऱ्या तपासण्या आणि पैशाच्या मोहापोटी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रकारही समोर येतात. असाच एक थरकाप उडवणारा अनुभव प्रसिद्ध मराठी अभिनेता अंशुमन विचारे यांची पत्नी पल्लवी विचारे यांच्यासोबत घडला आहे.
काय घडलं नेमकं?
पल्लवी विचारे काही काळापासून हार्मोनल समस्यांमुळे त्रस्त होती. अलोपॅथिक औषधांमुळे त्रास वाढू नये म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला. ती ठाण्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेली. पहिल्याच भेटीत ३५०० रुपये आकारले गेले आणि काही गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या भेटीत तिला पंचकर्म करावे लागेल असे सांगून ५०-६० हजार रुपये घेतले.
धक्कादायक रक्त काढण्याची प्रक्रिया
डॉक्टरांनी "डाएटसाठी ब्लड टेस्ट करावी लागेल" असे सांगून तिच्या हातावर सुई लावली. पल्लवीला वाटलं की इंजेक्शनने काही सैंपल घेतला जाईल. मात्र, १० मिनिटं सतत एका कॅप्सूल पॉटमध्ये रक्त घेतलं गेलं, जे जवळपास पाऊणभर भरलं. ही प्रक्रिया तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली.रक्त काढल्यानंतर काही वेळात पल्लवी बेशुद्ध पडली. डॉक्टर तिला छातीत दाब देत होत्या. अंशुमन विचारे यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये फोन केला. डॉक्टरांनी मात्र याला "रक्त पाहून बेशुद्ध पडली" असे म्हणत थातुरमातुर उत्तर दिले.
नंतरचा काळजीजनक काळ
घरी गेल्यावर पल्लवीला रात्रीभर उलट्या होत राहिल्या. दुसऱ्या दिवशी तिने फॅमिली डॉक्टरांकडे धाव घेतली. चाचणीत धक्कादायक सत्य समोर आलं. तिच्या शरीरात फक्त 6% रक्त उरले होते, जे प्राणघातक स्थिती मानली जाते. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारामुळे ती सावरली आणि आता ती हळूहळू पूर्णपणे बरी होत आहे.
सोशल मीडियावरून तक्रार
पल्लवी विचारेने तिचा अनुभव यूट्यूबवर व्हिडीओद्वारे शेअर करत, “माझा जीव गेला असता... मी मरता मरता वाचले!” अशा शब्दांत ती भावना व्यक्त केली. कुठलंही वैद्यकीय ज्ञान नसताना, केवळ व्यवसाय म्हणून आरोग्याचा खेळ करत असलेल्या डॉक्टरांवर तिने नाराजी व्यक्त केली. अंशुमन विचारे यांनी तिची काळजीपूर्वक साथ दिली, वेळेवर उपचार केले आणि आज ती पुन्हा नव्याने व्यायामाला सुरुवात करू शकली आहे.