Worli Hit And Run Accident : शहापुरात वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात

Worli Hit And Run Accident : वरळी अपघातानंतर तब्बल 48 तासांनंतर मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 9, 2024 12:08 PM IST

Worli Hit And Run Accident : वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शहापूरमधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे. मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या मिहीर शाहाच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शाह आणि त्याला मदत करणाऱ्या इतर 12 जणांना अटक केली आहे. मिहीर शाहने अपघातावेळी मद्यपान केले होते का, अपघातावेळी नेमके काय घडले याबद्दल अधिकची माहिती आता पोलीस घेतील. या आधी पोलिसांनी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे.

मिहीरला पळून जाण्याचा सल्ला

या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. तसेच ही गाडी मुख्य पुरावा असून ती अज्ञात स्थळी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत मिहीर शाहाने अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचे आपण सांगू' असा सल्ला दिल्याचेही पोलिस तपासातून समोर आले आहे.

वरळी अपघातावरून राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या विषयावरून धारेवर धरले आहे. मिहीर शाहाचे वडील राजेश शाह हे शिवेसना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते आहेत. त्यामुळे सत्ताधारी हे आरोपीला पाठीशी घालत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

आणखी वाचा :

Worli Hit And Run Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शाहाला जामीन मंजूर, 15 हजाराच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन

Worli Heat And Run Accident : 4 मित्रांनी सोबत येत एक एक बिअर पिवून 18 हजारांचे केलं बिल, बार मालकाचा खुलासा

Nagpur Hit And Run Accident : नागपुरात भरधाव बसने सायकलवरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडले, घटना CCTV मध्ये कैद

Share this article