Nagpur Hit And Run Accident : नागपुरात भरधाव बसने सायकलवरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडले, घटना CCTV मध्ये कैद

Nagpur Hit And Run Accident : नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसने धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली.

 

Nagpur Hit And Run Accident : नागपूर : गेल्या काही दिवसांत हिट अँड रनच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. पुणे पोर्शे अपघातानंतर संपूर्ण राज्यभरातील हिट अँड रनच्या घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. मुंबईतील वरळी हिट अँड रनच्या घटनेनंतर नागपुरातील अशाच एका घटनेनं सर्वांना हादरवून सोडले आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागपुरात सायकलवरुन जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला भरधाव बसने धडक दिली. या घटनेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसने धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली. बस भरधाव असल्यामुळे सायकलवरुन पडलेली वृद्ध व्यक्ती बसच्या चाकाखाली आली. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. पोलिसांना सदर बसची ओळख पटली असून बसचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

नागपुरात आता 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या दोन घटना

गेल्या 24 तासांत हिट अँड रनच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हिट अँड रनची घटना घडली. तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारने उडवले आहे. दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर फरार झाल्याचं समोर आले आहे. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर-कोराडी मार्गावर भीषण अपघात

नागपूर-कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली. त्यानंतर अनियंत्रित होऊन स्विफ्ट कार पलटी झाली.

आणखी वाचा :

Worli Hit And Run Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शाहाला जामीन मंजूर, 15 हजाराच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन

Worli Heat And Run Accident : 4 मित्रांनी सोबत येत एक एक बिअर पिवून 18 हजारांचे केलं बिल, बार मालकाचा खुलासा

Share this article