UP Crime News: निर्दयी बाप आणि सावत्र आईने मुलीला कालव्यात ढकललं

vivek panmand   | CMS
Published : Nov 28, 2026, 11:52 PM IST
UP Crime Father Stepmother Throw Teen Daughter Into Canal Muzaffarnagar Police Hear Her Cries And Save Her

सार

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या सावत्र पत्नीच्या मदतीने १५ वर्षीय मुलीला गंगेच्या कालव्यात ढकलले. मात्र, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिचा आवाज ऐकला आणि मुलीला सुखरूप बाहेर काढले.

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या सावत्र पत्नीच्या मदतीने स्वतःच्या १५ वर्षांच्या मुलीला गंगेच्या कालव्यात ढकलून दिले. तिला मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य करण्यात आले. ती मेली असावी, असा विचार करून ते तिथून निघून गेले. पण नशीब बलवत्तर म्हणून गस्तीवर असलेल्या पोलिसांना तिचा आवाज ऐकू आला. त्यांनी धाव घेत कालव्याच्या कडेला अडकलेल्या या मुलीला सुखरूप बाहेर काढले.

ही घटना २७ नोव्हेंबरच्या रात्री भोपा पोलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी फैजल आणि त्याची पत्नी साया हसीन या दोघांना अटक केली आहे. फैजल हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचवा-वाचवाचा आवाज अन् पोलिसांची एन्ट्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबरला रात्री १० च्या सुमारास जॉली पोलिस चौकीचे प्रभारी त्यांच्या टीमसह गस्त घालत होते.

तेव्हा त्यांना गंगेच्या कालव्याच्या दिशेने कोणीतरी 'वाचवा-वाचवा' ओरडत असल्याचा आवाज आला. पोलिसांनी लगेच त्या दिशेने धाव घेतली. तिथे त्यांना एक १५ वर्षांची मुलगी कालव्यात बुडताना दिसली. ती एका झाडाचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती.

ती कालव्यात अडकली होती आणि मदतीसाठी याचना करत होती. महिला पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी तिला सुखरूप बाहेर काढले.

आधी तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली.

बाप आणि सावत्र आईवर गंभीर आरोप

चौकशीदरम्यान या मुलीने आपल्या बापावर आणि सावत्र आईवर गंभीर आरोप केले. फैजल आणि साया हसीन यांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने कालव्यात ढकलले. मी मेले असे समजून ते निघून गेले, असे तिने पोलिसांना सांगितले.

ही मुलगी मुझफ्फरनगरमधील रुडाकली गावची रहिवासी आहे. हे गाव भोपा पोलिस स्टेशन आणि जॉली चौकीच्या हद्दीत येते.

तिने असेही सांगितले की, वडील आणि सावत्र आई तिला सतत मारहाण करायचे. याच छळाचा भाग म्हणून त्यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

भोपाचे सर्कल ऑफिसर (सीओ) राधा रमण सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गस्तीवर असताना पोलिसांना मुलीचा आवाज आला आणि त्यांनी महिला पोलिसाच्या मदतीने तिला वाचवले, असे त्यांनी सांगितले.

गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी फैजल आणि साया हसीन यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११५(२) आणि ३(५) तसेच बाल न्याय कायद्याच्या (मुलांची काळजी आणि संरक्षण) कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, फैजल हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. सुदैवाने गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे या मुलीचा जीव वाचला.

आता पोलिस या बाप आणि सावत्र आईच्या कृत्याची सखोल चौकशी करत आहेत.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Lahore Train Accident: धुळीमुळे दिसलं नाही, लाहोरमध्ये रेल्वेने दुचाकीस्वाराला उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
Himachal School Assault: हिमाचल प्रदेशमध्ये 9वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण