
हिमाचल प्रदेशातील एका शाळेतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 9वीच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाळेने 6 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. हिमाचल प्रदेश मधील एका शाळेत काही सीनिअर विद्यार्थी 9वीच्या एका मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी या मारहाणीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शाळा प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
ही धक्कादायक घटना किन्नौर जिल्ह्यातील रेकाँग पिओ येथील जवाहर नवोदय विद्यालयात घडली आहे. प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती किन्नौरच्या उपायुक्त सोनाक्षी तोमर यांनी पीटीआयला दिली. शिक्षण विभाग आणि बाल कल्याण समितीच्या पथकांनी प्राथमिक चौकशीसाठी शाळेला भेट दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असल्याचे तोमर यांनी सांगितले. तसेच पीडित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचे समुपदेशन केले जात आहे.
The Incident Is From Kinnaur, Himachal Pradesh.
How much Safe Our Hostels & Boarding Schools For Young Kids..
Group of students mercilessly beating up their own fellow student in Kinnaur, Himachal Pradesh. https://t.co/soeRjcuN26
— Socialist Indian (@yourshreya007) November 27, 2026
ही घटना सप्टेंबरमध्ये घडली होती, मात्र याचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये 11वी आणि 12वीचे 5-6 विद्यार्थी 9वीच्या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. त्याला आधी बेडवर ढकलले जाते आणि नंतर जमिनीवर पाडून मारहाण केली जाते. यावेळी हल्ला करणारे विद्यार्थी त्याला शिवीगाळ करत धमकावतानाही ऐकू येत आहेत.
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी कशी मिळाली, याचाही प्रशासन तपास करत आहे. काही विद्यार्थी परवानगीशिवाय कॅम्पसबाहेर गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला होता, अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली. मात्र, मारहाणीचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसून तपास सुरू आहे.
मारहाण करणारे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पोलीस चौकशी समितीच्या अहवालाची वाट पाहत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुशील शर्मा यांनी दिली. या प्रकरणी 6 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मारहाण, कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि शाळेतील इतर कथित गैरप्रकारांची चौकशी अद्याप सुरू आहे.