
Thane Crime News : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्वतःला ‘दिक्षित बाबा’ म्हणवून घेणाऱ्या मंजूनाथ शेट्टीने काळी जादू आणि अघोरी पूजेच्या नावाखाली लोकांना फसवत कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. या पैशांची उधळपट्टी तो गोव्यातील आलिशान हॉटेल्स आणि कसिनोमध्ये करत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मंजूनाथ शेट्टी उर्फ ‘दिक्षित बाबा’ हा विशेषतः श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना लक्ष्य करत असे. “तुमच्यावर काळी जादू झाली आहे”, “तुमचं आयुष्य धोक्यात आहे” किंवा “अघोरी पूजा केल्यास अमाप संपत्ती मिळेल” अशा भीतीदायक आणि आमिष दाखवणाऱ्या गोष्टी सांगून तो लोकांना जाळ्यात अडकवत असे. अपत्य न झालेल्या जोडप्यांनाही तो विशेष पूजेचे आमिष दाखवत मोठ्या रकमा उकळत होता.
या बाबाची कार्यपद्धती अत्यंत वेगळी होती. तो पीडितांना अघोरी पूजा करण्यासाठी गोव्यात घेऊन जात असे, मात्र प्रत्यक्षात कोणतीही पूजा न करता त्यांच्याकडून घेतलेले पैसे पंचतारांकित हॉटेल्स आणि कसिनोमध्ये उडवत असे. तपासात एका रात्रीत तब्बल 14 लाख रुपयांचे बिल त्याने कसिनोमध्ये भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच त्याला ‘कसिनो बाबा’ अशी ओळख मिळाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा भोंदू बाबा विमानाने प्रवास करत असे आणि गोव्यातील महागड्या हॉटेल्समध्ये राहत असे. त्याच्यासोबत रशियन आणि कझाकिस्तानमधील महिलांचा वावर असल्याचेही समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला गोव्यातील कसिनोमध्ये नेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनीही त्याच्या आलिशान जीवनशैलीबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
या प्रकरणात गोव्यातील एका कसिनो मॅनेजरचाही सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो ते कोट्यवधी रुपये जमा केल्याचे पुरावे मिळाले आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास ठाणे पोलीस करत आहेत.