Satara Crime : कराडमध्ये प्रेयसीकडून प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या; मध्यरात्री घडली खळबळजनक घटना

Published : Feb 18, 2026, 11:22 AM IST
Death

सार

Satara Crime : कराडजवळील आगाशिवनगर येथे मध्यरात्री एका विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घरात घुसून मारहाण व संशयाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Satara Crime : कराड शहराजवळील आगाशिवनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले. घरात घुसून मारहाण केल्याच्या आरोपानंतर विवाहित प्रेयसीने संतापाच्या भरात प्रियकरावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत प्रियकराचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

प्रेमसंबंधातून वादाची ठिणगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजा गोरे (नाव बदललेले) हा गवंडी काम करत होता, तर आरोपी वंदना साळी (नाव बदललेले) ही मजुरीचे काम करते. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित असून वंदनाला दोन विवाहित मुली आहेत. सोमवारी मध्यरात्री राजा हा वंदनाच्या घरात घुसला. त्यावेळी वंदना आणि तिची एक मुलगी घरात उपस्थित होती. भेटायला येत नसल्याच्या कारणावरून आणि बाहेर संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्याने वाद घालण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.

संतापाच्या भरात कुऱ्हाडीने हल्ला

वाद वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात वंदनाने घरातील कुऱ्हाडीने राजावर हल्ला केला. त्याच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर वंदनाने डायल 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. ओळखीच्या व्यक्तीने मारहाण करण्यासाठी घरात घुसल्याचे सांगत मदत मागितली.

पोलिसांची कारवाई

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असता आरोपी महिला हातात कुऱ्हाड घेऊन बसलेली आढळली. तिच्या अंगावर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. मंगळवारी तिला कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा डिसले करत आहेत.

प्राथमिक चौकशीत उघड झालेले कारण

आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती वारंवार भेटण्यासाठी त्रास देत होता व संशयाच्या कारणावरून मारहाण करत होता. मध्यरात्री घरात घुसून तिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याने संतापाच्या भरात हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Crime News: आता भाड्याने मिळतात गुन्हेगार; जगाला हादरवणारे 'Crime-as-a-Service'
खाकीला काळिमा! मैत्रिणीच्या प्रेमात मित्राचा गेम; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसाने पार केली १९१ किमीची हद्द!