
Korean Game Addiction: कोणत्याही व्हिडिओ गेमचे व्यसन ही मुलांमधील एक गंभीर समस्या बनत असून, जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘गेमिंग डिसऑर्डर’ आजार मानले आहे. या व्यसनामुळे मेंदूत डोपामाइनची पातळी वाढून नैराश्य, लठ्ठपणा, डोळ्यांचे विकार आणि चिडचिड वाढते. अति-गेमिंगमुळे मानसिक संतुलन बिघडणे, आत्म*त्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे, आणि कौटुंबिक/सामाजिक संबंधांपासून दूर जाणे असे दुष्परिणाम बघायला मिळतात. याच्या व्यसनापासून मुलांना कसे वाचवाल? जाणून घेऊयात…
कोरियन गेमच्या (Korean Game) आहारी जाऊन बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्म*त्या केलेल्या तीन मुलींच्या केसमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. पोलीस मुलींच्या आई-वडिलांची पार्श्वभूमी तपासत आहेत. दरम्यान, त्यांचे वडील चेतन कुमार यांनी या दुःखद घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. पालकांना मुलांचा फोन हिसकावून घेण्याचा हक्क नाही का, असा प्रश्न या प्रकरणाने निर्माण केला आहे.
निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यानंतर एक-एक करून त्यांनी खिडकीतून खाली उडी मारली. चेतन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ते आपल्या मुलींवर खूप प्रेम करत होते. पण या तिन्ही मुली कोरियन ड्रामा, कोरियन गेम्स आणि कोरियन रील्सच्या व्यसनाच्या बळी ठरल्या होत्या. दिवसभर कोरियन व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यांचे डोळे सुजले होते. हे लक्षात आल्यावर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या हितासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होते. त्यांनी मुलींकडून मोबाईल हिसकावून घेतला होता. पण तीच आता मोठी चूक ठरली आहे. चेतन कुमार यांनी आपल्या तिन्ही मुलींना गमावले आहे.
वडिलांनी फोन हिसकावून घेताच मुलींच्या वागण्यात बदल झाला होता. घटनेच्या आदल्या दिवशी त्यांनी आईच्या मोबाईलवर कोरियन व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण ते ॲप चालले नाही. सायबर क्राईम टीम्स IMEI नंबर वापरून मोबाईल फोन खरेदीदारांचा शोध घेत आहेत, जेणेकरून कोरियन ॲप्लिकेशनमधून डेटा काढता येईल. पोलीस या प्रकरणाचा अनेक बाजूंनी तपास करत आहेत. ते फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत.
कोरोना महामारीमुळे कुटुंब आर्थिक संकटात होते. डोक्यावर बरेच कर्ज होते. आत्म*त्या केलेल्या मुलींचे आईपेक्षा वडिलांसोबत अधिक भावनिक नाते होते. त्यांनी सुसाईड नोट वडिलांना उद्देशून लिहिली आहे. नऊ पानांच्या छोट्या डायरीतून असे दिसून येते की त्यांनी कोरियन संस्कृती, एकटेपणा आणि कौटुंबिक समस्या गांभीर्याने घेतल्या होत्या.
ही घटना उघडकीस आल्यानंतर कोरियन ॲप्लिकेशन आणि गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीत याविरोधात आंदोलनही झाले आहे. ऑनलाइन गेम्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.
गेम्सपासून मुलांचे संरक्षण कसे करावे?
किशोरवयीन मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसतो. जेव्हा ते गेमच्या व्यसनात अडकतात, तेव्हा ते त्यालाच खरे आयुष्य समजू लागतात. ते व्हर्च्युअल रोल मॉडेलसोबत आपल्या आयुष्याची तुलना करतात. मोबाईल हिसकावून घेतल्यावर किंवा गेम खेळण्यापासून रोखल्यावर त्यांना एकटेपणा जाणवतो. आपली ओळख गमावण्याची भीती त्यांना वाटते.
तुमची मुले गेमिंगच्या व्यसनाला बळी पडली आहेत हे तुमच्या लक्षात येताच, त्यांचा मोबाईल हिसकावून घेणे, त्यांना मारणे किंवा त्यांच्यावर ओरडणे टाळा. हळूहळू मुलांची दिनचर्या बदला. त्यांना समजावून सांगा आणि त्यांची मानसिकता बदला. त्यांचे मन मोबाईल गेममधून मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी प्रयत्न करा. जर मुले जास्तच विचित्र वागत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.