
Mumbai Crime : गोरेगाव पूर्वेच्या परिसरात काही दिवसांपूर्वी दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून या दोघांनी अजहर नावाच्या व्यक्तीचा दगडाने डोक्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी मेट्रोचा खांब क्रमांक 7/388 जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला या प्रकरणी वनराई पोलीस स्थानक येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अजहर असल्याचे पोलिसांना समजले. तो परिसरात कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करत होता. अजहर हा सुरेश उर्फ कालिया आणि सलीम उर्फ नेपाळी यांच्यासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र घटनेनंतर हे दोघेही अचानक फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
शवविच्छेदन अहवालात अजहरच्या डोक्यावर गंभीर मारहाणीमुळे जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश बने आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाषचंद्र पोस्टुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कन्हेरकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सुरेश उर्फ कालिया याला हरयाणातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार सलीम उर्फ नेपाळी याच्यासह पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून अजहरचा दगडाने डोक्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली. कालियाच्या कबुलीच्या आधारे पोलिसांनी 11 मार्च रोजी मालाड पूर्वेतील पठाणवाडी परिसरातून सलीम उर्फ नेपाळी याला अटक केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनराई पोलीस स्थानकातील पोलिस करत आहेत.