
मध्य प्रदेशातून एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका कार चालकाने बाप-लेकाला गाडीच्या बोनेटवरून तब्बल चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गाडीचा धक्का लागल्यावरून वाद झाला होता. यावेळी आरोपी चालकाने वडिलांच्या कानशिलात लगावली. बाप-लेकाने याला विरोध केला, तेव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि दोघांना बोनेटवरून फरफटत नेलं.
लोनी फाटा परिसरात काही लोकांनी ही गाडी अडवली आणि दोघांचे प्राण वाचवले. तोपर्यंत चालकाने त्यांना सुमारे चार किलोमीटर फरफटत नेलं होतं. संतापलेल्या जमावाने आरोपी चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेत बाप-लेक दोघेही जखमी झाले आहेत. वृद्ध वडिलांच्या बोटाला, तळहाताला आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे.
आशिष असं या आरोपी चालकाचं नाव असून तो इंदूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कारही जप्त केली आहे. कुक्षी येथील सुतार मोहल्ल्यात हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही आता समोर आला आहे.
Kukshi - A shocking incident was reported from Kukshi in Madhya Pradesh’s Dhar district, where a car driver allegedly dragged an elderly man and his son on the bonnet of his vehicle for nearly four kilometres after they objected to a collision. The elderly man sustained serious injuries, while the accused was caught and beaten by locals before being handed over to the police. CCTV footage of the incident has also emerged.
— NextMinute News (@nextminutenews7) October 23, 2026
जखमी बाबूलाल सीरवी हे सीरवी मोहल्ल्यात राहतात आणि शेती करतात. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते शेताकडे पायी चालले होते. त्याचवेळी MP13-ZL-8063 या नंबरच्या कारने त्यांना धडक दिली. बाबूलाल यांनी चालकाला गाडी नीट चालवण्यास सांगितलं, तेव्हा आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. याच वेळी बाबूलाल यांचा मुलगा भरत याने आरोपी चालक आशिषचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
या गोष्टीचा आशिषला राग आला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला. यामुळे बाप-लेक दोघेही कारच्या बोनेटवर पडले. दोघांनी गाडी थांबवण्याची खूप विनंती केली, पण आरोपीने गाडी थांबवली नाही.
ओंकारजी काग यांचा मुलगा धर्मेंद्र, जयदीप गुंजाळ आणि इतर काही लोकांनी गाडीचा पाठलाग केला आणि लोनी फाट्याजवळ गाडी अडवली. सुदैवाने यात बाप-लेकाचे प्राण वाचले.
या घटनेत बाबूलाल यांच्या उजव्या हाताची बोटं, तळहात, उजवा गुडघा आणि बरगड्यांना मार लागला आहे. तर भरतच्या उजव्या हाताचं मनगट, अंगठा आणि डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. घटनेनंतर दोघांनीही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी कार चालकावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.