
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून 25 जानेवारीच्या रात्री तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि दीर अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत दीप्तीच्या आई हेमलता मगर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दीप्तीचे लग्न 23 नोव्हेंबर 2019 रोजी रोहन कारभारी चौधरी याच्यासोबत झाले होते. सुरुवातीचा एक महिना संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. दिसणं, घरकाम, स्वयंपाक यावरून तिला कमी लेखण्यात येऊ लागले आणि मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, पती रोहन याने दीप्तीला मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली होती. यानंतर तिच्या सासरकडील लोकांनी व्यवसायासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, जी माहेरकडून देण्यात आली. त्यानंतरही छळ थांबला नाही. चारचाकी गाडीसाठी पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि ते पैसेही दिले गेले.
लग्नात दिलेले सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने सासू आणि पतीने काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत आहे. चोरीचा धोका सांगून हे दागिने घेतल्यानंतर पुढे ते व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं दीप्तीला सांगण्यात आलं. या प्रकारामुळे दीप्ती अधिक मानसिक तणावात गेली होती.
तक्रारीतील सर्वात गंभीर आरोप म्हणजे दीप्तीवर जबरदस्ती गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करण्यात आल्याचा आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा गर्भवती असताना पाच महिन्यांच्या बाळाची गर्भलिंग तपासणी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. बाळ मुलगी असल्याचे समजताच तिच्या इच्छेविरोधात गर्भपात करण्यात आला, असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे.
सासू ग्रामपंचायत सरपंच झाल्यानंतर निवडणुकीसाठी आणि ‘मोठेपणा दाखवण्यासाठी’ पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. दीप्तीने नकार दिल्यानंतर तिचा छळ अधिक वाढल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सतत होणाऱ्या मानसिक खच्चीकरणामुळे ती पूर्णपणे तुटली होती.
या सर्व छळाला कंटाळून दीप्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे तीन वर्षांची मुलगी घरातच असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.