
अमृतसरमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल वर्दीत असताना दारूच्या नशेत झिंगत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमृतपाल सिंग असे या कॉन्स्टेबलचे नाव असून तो पोलीस नियंत्रण कक्षात (PCR) तैनात होता. व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त (शहर) जोगेश्वर सिंग गोराया यांनी दिली.
शुक्रवारी माहिती देताना गोराया म्हणाले, "सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यात एक व्यक्ती दारूच्या नशेत दिसत होता. तो व्यक्ती पीसीआरमध्ये तैनात असलेला कॉन्स्टेबल अमृतपाल सिंग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो आधीच कर्तव्यावर गैरहजर होता. या व्हिडिओची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले होते. त्याला आता निलंबित करण्यात आले आहे."
Complete Information Regarding the Video Circulating on Social Media.
#FactCheck https://t.co/S65SNttcKi
— Commissionerate Police Amritsar (@cpamritsar) November 20, 2026
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसाच्या गणवेशात असलेला अमृतपाल सिंग उभा राहण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत होते. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुरुवारी संध्याकाळी सुलतानविंड रोडवर अमृतपाल सिंगच्या कारने एका १२ वर्षीय मुलीला धडक दिल्याचे आरोपही होत आहेत. या घटनेत मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.