
बेंगळुरूच्या कोडिगेहळ्ळी येथील गुंडंजनेय मंदिर उद्यानात एका २५ वर्षीय तरुणाने त्याच्या ३४ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणीत भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. पत्नीचे इतर कुणाशी तरी संबंध असल्याचा त्याला संशय होता. या गुन्ह्याची माहिती तब्बल दोन महिने कुणालाच मिळाली नाही. अखेर त्या उद्यानात महिलेचा सांगाडा सापडल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. सुजाता असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी तिचा दुसरा पती फैयाज पाशा उर्फ काळू याला अटक केली आहे. तो मूळचा चिक्कबल्लापूरचा आहे.
६ नोव्हेंबर रोजी एका गोणीत हा सांगाडा आढळून आला. तपासादरम्यान कोडिगेहळ्ळी पोलिसांना सांगाड्याजवळ एका पाकिटात सुजाताचे आधार आणि पॅन कार्ड सापडले. तिची कवटी गोणीपासून सुमारे ३० मीटर अंतरावर सापडली.
सुजाताच्या पहिल्या पतीचं सुमारे पाच वर्षांपूर्वी निधन झालं होतं. ती जक्कुर लेआउटमध्ये राहायची आणि कचरा वेचण्याचं काम सुरू करण्यापूर्वी तिने आपल्या पाच मुलांना बहिणीच्या घरी ठेवलं होतं.
नंतर तिची ओळख पाशाशी झाली. तो तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान होता आणि कचरा वेचण्यासोबतच बांधकाम मजूर म्हणून काम करत असे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं.
पण पाशाने सुजाताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि तिचे इतर कुणाशी संबंध असल्याबद्दल तिला जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढल्याने त्याने तिला सोडून दिलं.
काही दिवसांनी सुजाताने पुन्हा पाशाची भेट घेतली आणि एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करून त्याला मनवलं. पण एकत्र आल्यावरही त्यांच्यातील तणाव कमी झाला नाही आणि त्यांच्यात पुन्हा भांडणं सुरू झाली. ते उद्याने, बसस्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी राहत होते.
असाच एक वाद उद्यानात सुरू असताना पाशाने चाकूने सुजाताचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह त्यांनी कचरा गोळा करण्यासाठी वापरलेल्या गोणीत कोंबला, उद्यानाच्या एका कोपऱ्यात टाकला आणि त्यावर कचरा टाकून तिथून पळ काढला, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगाड्याजवळ सापडलेल्या आधार आणि पॅन कार्डच्या आधारे सुजाताची ओळख पटवली आणि तिचं पाशाशी लग्न झाल्याचं निष्पन्न केलं. पोलिसांनी पाशाचा शोध घेत त्याला येलहंका येथील रैतारा संथे येथून १८ नोव्हेंबरला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी हत्येच्या रात्री दोघे उद्यानात मद्यपान करत असताना त्यांच्यात वाद झाला आणि पाशाने चाकूने तिचा गळा चिरला, अशी कबुली त्याने दिली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला एका कुत्र्याने सुजाताची कवटी बाहेर काढल्याने ही हत्या उघडकीस आली. सकाळी फिरणाऱ्यांनी तो सांगाडा पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर पाशाला अटक केली.