
दिल्लीतील आरके पुरम भागात एका कारने दुचाकीला धडक देऊन रस्त्यावरून कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७३ वर्षीय कार चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री १०.२२ च्या सुमारास घडली.
पोलिसांनी याप्रकरणी वसंत कुंज येथे राहणाऱ्या वेणू गोपाल या ७३ वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. ते त्यांची निळ्या रंगाची होंडा अमेज कार चालवत होते. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तनिष टोकस याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तनिष दुचाकीवरून खाली पडला, पण सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
🚨 CAR DRAGS BIKE FOR SEVERAL METRES IN DELHI’S RK PURAM
A video from RK Puram, Delhi shows a car dragging a motorcycle trapped underneath it on Africa Avenue Road.
The incident took place on September 17. Delhi Police said the motorcycle rider fell after the car hit his parked… pic.twitter.com/Dkfx8CEXQu— contentkikamii (@contentkikamii) September 18, 2026
धडक दिल्यानंतरही कार थांबली नाही. दुचाकी कारखाली अडकली आणि तशीच काही मीटरपर्यंत फरफटत गेली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत कार थांबवली. याच दरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये दुचाकी कारखाली अडकलेली आणि रस्त्यावरून घासून जाताना स्पष्ट दिसत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी वेणू गोपाल यांना अटक केली असून त्यांची होंडा अमेज कार जप्त केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. अपघातानंतर पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी केली, मात्र त्यात त्यांनी मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यांनी इतर कोणतीही नशा केली होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या अपघातामागच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.