
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भररस्त्यात दोन कार चालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. हा प्रकार पाहून लोकांना एखाद्या सिनेमातील फाईट सीनची आठवण झाली. सेक्टर ३८ मधील हुडा मार्केटमध्ये ही घटना घडली. एका छोट्याशा वादातून सुरू झालेलं हे भांडण नंतर जीवघेण्या राड्यात बदललं. या घटनेचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या व्हिडिओमध्ये एक काळ्या रंगाची बलेनो कार वेगात येते आणि समोरून एका कॅबला मुद्दाम जोरदार धडक देते, असं स्पष्ट दिसत आहे.
धडक दिल्यानंतर कॅब चालक दुसऱ्या चालकाला जाब विचारण्यासाठी गाडीतून खाली उतरतो. पण त्याचवेळी बलेनो कार त्यालाही धडक देते. यानंतर संतापलेला कॅब चालक एका मोठ्या दगडाने बलेनो कारवर हल्ला करताना दिसतो. सुदैवाने यात त्याला फार मोठी दुखापत झाली नाही. त्यानंतर हा कॅब चालक पुन्हा आपल्या गाडीत बसतो, गाडीचा यू-टर्न घेतो आणि काळ्या बलेनोला बाजूने जोरदार धडक देतो.
Road-rage Kalesh b/w Hyundai Aura car guy and Maruti Suzuki Baleno car guy, 📍Gurugram, Haryana. pic.twitter.com/XLe0nL5k1g
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) September 20, 2026
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोघांमध्ये फक्त बाचाबाची झाली होती, पण नंतर या वादाने हिंसक वळण घेतलं. या भांडणामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
गुरुग्रामच्या सेक्टर ८९ मध्येही अशीच एक घटना घडली होती. तिथे एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार चालकाने मित्रांसोबत झालेल्या वादानंतर एका टॅक्सीला वारंवार धडक दिली होती. सुदैवाने यात तिघांचे प्राण वाचले. रात्री उशिरा घडलेला हा प्रकारही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्र दिल्ली पासिंगच्या थारमधून सेक्टर ८९ मध्ये आले होते. त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि दोघे जण गाडीतून खाली उतरले. घरी जाण्यासाठी त्यांनी रॅपिडो टॅक्सी बुक केली. ते दोघे टॅक्सीत बसल्यानंतर थार चालकाचा राग अनावर झाला आणि त्याने आपली गाडी रिव्हर्स घेत टॅक्सीला वारंवार धडक दिली. टॅक्सी चालकाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आरोपीने गाडीचं नुकसान करणं सुरूच ठेवलं. या धडकेत टॅक्सीच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं होतं.