
मुंबई : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल तांगडी याच्यासह आणखी एकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सदर घटनेमुळे भिवंडी शहर हादरले असून हल्ला झालेल्या दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर दुसऱ्याचे नाव तेजस तांगडी असे आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण आहेत याचा शोध सुरू असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत जेडीटी इंटरप्रायसेस या कार्यालयात बसले होते. दरम्यान, रात्री सुमारे 11 वाजता चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी देखील त्यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, मात्र त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. पोलिसांकडून हल्ल्यामागील नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे आणि मारेकरी फरार आहेत.
उल्हासनगरमध्ये मोटारसायकल कट प्रकरणावरून हल्ला
उल्हासनगर कॅम्प क्र. 3 मधील कव्हाराम चौकात मोटारसायकलची कट लागल्याच्या कारणावरून एक गंभीर हल्ला झाला आहे. परशुराम रेड्डी नावाच्या तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी परशुराम मोटारसायकलवरून जात असताना, एका महिलेला कट लागल्यामुळे वाद झाला. वादाच्या दरम्यान काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.