
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एक भयावह घटनेने परिसर हादरला आहे. 63 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचा त्यांच्या राहत्या घरी हात-पाय घट्ट बांधून खून झालेला आढळून आला. या घटनेमुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा.
मैत्रिणीसोबत फिरायला जाण्याआधीच मृत्यू
वर्षा जोशी या गुरुवारी आपल्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी हैदराबादला जाण्याच्या तयारीत होत्या. मात्र, वारंवार फोन करूनही त्या प्रतिसाद देत नव्हत्या. चिंताग्रस्त मैत्रिणीने त्यांच्या शेजाऱ्यांना संपर्क केला. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, बेडवर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रतिकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनास्थळी मिळाले धक्कादायक पुरावे
वर्षा जोशी यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते, मात्र डीव्हीआर गायब होता. घराचा मागचा दरवाजा उघडा असल्याने चोरीची शक्यता अधिक बळावली आहे. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते, पण मंगळसूत्र व काही दागिने मृतदेहाजवळ आढळले. तरीही घरातील इतर किमती वस्तू किंवा दागिने चोरीस गेले आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या
पतीच्या निधनानंतर वर्षा जोशी या एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते. शिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर त्या शांत जीवन जगत होत्या. मात्र, आनंदाचे क्षण उपभोगण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
खूनाचा संशय
वर्षा जोशी यांच्या कपड्यांची स्थिती आणि चेहऱ्यावरचे व्रण पाहता हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत अजूनही गूढ कायम आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणाने संपूर्ण रत्नागिरी हादरून गेले आहे.