
Alibag Crime : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आवास गावात गुरुवारी रात्री घडलेल्या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहन पार्किंगच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून, या हल्ल्यात धर्मेंद्र नंदकुमार राणे (वय ३६, रा. राणे आळी, आवास) यांचा मृत्यू झाला आहे. तर विवेक नंदकुमार राणे, विश्वास नंदकुमार राणे (वय ३२) आणि करुणा नंदकुमार राणे हे तिघेजण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी जखमी विवेक नंदकुमार राणे यांनी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी २२ मे २०२५ रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास राणे कुटुंब आपल्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये फोर व्हीलर पार्क करत असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पूनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे (सर्व रा. आवास) यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात धर्मेंद्र राणे यांना वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी पकडून ठेवले आणि देवेंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या छातीत चाकू खुपसला. शुभम पाटीलने विश्वास राणेला पकडून ठेवले, आणि आरोपी अंकित राणे यांनी त्याच्या छातीतही चाकू खुपसला. सिया म्हात्रे हिने विवेक राणे यांच्या कमरेवर सुरा मारला आणि त्यांची आई हस्तक्षेप करण्यास आली असता, पूनम म्हात्रे हिने तिच्या मानेवर सुरा मारला. या भयंकर हल्ल्यात धर्मेंद्र राणे यांचा मृत्यू झाला असून, इतर तिघे जखमी होऊन त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम 2023 चे १०३, १०९, १२६(२), ११८(१), ३५२, ३५१(२), १९०, १९१(२,३) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम ४, २७ आणि मकोका कायद्यान्वये (कलम ३७(३)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे.