तब्बल 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना धडधाकट पाहून डॉक्टरही अचंबित झाले. त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यामागे हे आहे सीक्रेट.
उत्तरकाशी येथे 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची मंगळवारी (28 नोव्हेंबर) सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर PM मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला.
'बाबा केदारनाथ व भगवान ब्रदीनाथाची कृपा असल्याने आपली सुखरूप सुटका झाली. आपण मोठे धाडस दाखवले', असे म्हणत PM मोदींनी कामगारांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.
'खाण्यापिण्याव्यतिरिक्त दुसरे काहीही काम नव्हते. यामुळे सकाळी वॉक केल्यानंतर सर्वजण एकत्रित योगासनांचाही सराव करत होतो', अशी माहिती कामगारांनी यावेळी दिली.
पंतप्रधानांशी संवाद साधताना कामगारांनी सांगितले की, ‘सकाळी-संध्याकाळी वॉक करणे व योग- ध्यानधारणेमुळे आमच्यातील सकारात्मकता टिकून राहण्यास मदत मिळाली’.
कामगार गब्बर सिंह यांनी सांगितले की, योग व मॉर्निंग वॉकव्यतिरिक्त संध्याकाळी जेवल्यानंतरही अडीच किलोमीटर लांब असलेल्या बोगद्यात सर्वजण चालण्याचा व्यायाम करत होतो.
PM मोदींशी संवाद साधताना कामगार म्हणाले की, आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहिलो. कोणाला काही त्रास झाला तर सर्वजण काळजी घेत होतो, एकत्रित जेवलो व आरोग्याचीही काळजी घेतली.
योगमुळे कामगारांना सकारात्मक ऊर्जा मिळाली व वॉकमुळे शारीरिक-मानसिक आरोग्य निरोगी राहिले.
बिहारचे रहिवासी असलेले सोनू कुमार या कामगाराशी बोलताना PM मोदींनी म्हटले की, 'तुम्ही दाखवलेले धैर्य, येत्या काळात लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल'.
12 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बोगद्याचा वरचा भाग कोसळून 41 कामगार अडकले होते. यानंतर तब्बल 17 दिवसांनंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.