
मुलांच्या चेहऱ्यावर दाढी-मिशी यायला साधारण १२-१५ वर्षे लागतात. पण सध्या एका नवजात बाळाच्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रुग्णालयातल्या निळ्या रंगाच्या चादरीवर झोपलेल्या या चिमुकल्याच्या ओठांवर चक्क एक जाडजुड काळी मिशी स्पष्ट दिसत आहे! नुसती मिशीच नाही, तर त्याच्या डोक्यावर भरपूर केस आणि गालांवरही दाढीसारखे बारीक केस या व्हिडीओत दिसत आहेत. 'मिशीवाल्या बाळाचा' हा व्हिडीओ दक्षिण अमेरिकेतल्या इक्वाडोर या देशातला असल्याचं सांगितलं जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये झोपलेल्या या बाळाचं हे अजब रूप पाहून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला. इन्स्टाग्रामपासून ते 'एक्स' (पूर्वीचं ट्विटर) पर्यंत सगळीकडे सध्या याच रीलची चर्चा आहे.
या व्हिडीओखाली लोक भन्नाट कमेंट्स आणि मीम्स शेअर करत आहेत. एका युझरने मस्करीत लिहिलं, "हा पोरगा जन्मापासूनच मध्यमवयीन माणसासारखा दिसतोय!" दुसरा म्हणाला, "हा तर रिटायरमेंटनंतर जन्माला आल्यासारखा वाटतोय! याच्या खांद्यावर आधीच होम लोन असावं." तर आणखी एकाने, "हा तर हातात बिअरचा ग्लास घेऊन बसायला एकदम रेडी आहे!" अशी खिल्ली उडवली.
A newborn baby is going VIRAL for arriving in this world with a FULL MUSTACHE
Bro skipped kindergarten and went straight to his midlife crisis 🤣
Writer: Sol
https://t.co/VJY2V55Jfs
— Mario Nawfal (@MarioNawfal) October 23, 2026
हा व्हिडीओ फक्त एक मस्करी आहे की यामागे खरंच एखादा वैद्यकीय चमत्कार आहे, यावर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेत बाळांच्या अंगावर 'लानुगो' (lanugo) नावाचे बारीक केस येतात. पण हे केस सहसा खूप मऊ आणि फिकट रंगाचे असतात, जे वेळेनुसार गळून पडतात. वैद्यकीय विज्ञानानुसार, एखाद्या नवजात बाळाच्या चेहऱ्यावर मोठ्या माणसांसारखी इतकी जाड आणि काळीभोर मिशी असणं अत्यंत दुर्मिळ आहे.
त्यामुळे हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून बनवला असण्याची दाट शक्यता आहे.
या व्हिडीओच्या सत्यतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक फॅक्ट-चेकिंग संस्थांच्या अहवालानुसार, इक्वाडोरमधल्या कोणत्याही विशिष्ट रुग्णालयाची किंवा या बाळाच्या कुटुंबाची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाशी संबंधित कोणतेही अधिकृत वैद्यकीय रेकॉर्ड्सही सापडलेले नाहीत. व्हिडीओ तज्ज्ञांच्या मते, एआय (AI) फिल्टर किंवा डिजिटल एडिटिंग टूलचा वापर करून या बाळाच्या चेहऱ्यावर मिशी लावण्यात आली आहे. व्हिडीओमधली लाईटिंग आणि त्वचेचा पोत यातील तफावत पाहून, हा एआयने तयार केलेला फेक व्हिडीओ असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अशा फेक व्हिडीओंचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. या व्हिडीओची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नसली, तरी इक्वाडोरचा हा 'मिशीवाला मुलगा' सध्या इंटरनेटच्या दुनियेत चांगलाच भाव खाऊन जात आहे.