Villa Vie Odyssey: समुद्रात घर घेण्याचं स्वप्न भंगलं! इंधन टंचाईमुळे लक्झरी क्रूझ कंबोडियात थांबली, २०० प्रवासी अडकले

vivek panmand   | CMS
Published : Oct 28, 2026, 04:04 PM IST
Villa Vie Odyssey: समुद्रात घर घेण्याचं स्वप्न भंगलं! इंधन टंचाईमुळे लक्झरी क्रूझ कंबोडियात थांबली, २०० प्रवासी अडकले

सार

स्वतःचं घर विकून काहींनी जहाजावर घर घेतलं होतं. आयुष्यभर एकाच जागी राहण्यापेक्षा समुद्रावर तरंगत्या लक्झरी क्रूझमध्ये जगण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न आता चक्काचूर झालंय.

स्वतःचं घरदार विकून काहींनी जहाजावर घर घेतलं होतं. निवृत्तीनंतरची सगळी पुंजी त्यांनी या तरंगत्या लक्झरी क्रूझवर लावली होती. आयुष्यभर एकाच घरात राहण्यापेक्षा जहाजावर राहून जगभर फिरायचं, असं त्यांचं स्वप्न होतं. कधी आशिया, कधी युरोप तर कधी अमेरिका... समुद्रच त्यांचा कायमचा पत्ता असणार होता. पण इंधनाची टंचाई आणि पैशांची चणचण यामुळे त्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरलं गेलंय. ऑक्टोबर २०२४ मध्ये उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट बंदरातून 'व्हिला व्ही ओडिसी' (Villa Vie Odyssey) या जहाजाने प्रवास सुरू केला होता. पण आता या लक्झरी क्रूझची चाकं कंबोडियाच्या बंदरात थांबली आहेत. अवघ्या सात तासांची नोटीस देऊन प्रवाशांना जहाज रिकामं करायला सांगितलंय. यामुळे सुमारे २०० प्रवासी आता अक्षरशः वाऱ्यावर पडले आहेत.

नेमका प्लॅन काय होता?

अमेरिकेच्या 'व्हिला व्ही रेसिडेन्स' या कंपनीची ही 'व्हिला व्ही ओडिसी' लक्झरी क्रूझ आहे. साडेतीन वर्षांत १५० हून अधिक देश फिरण्याचा या कंपनीचा प्लॅन होता. पण आता या वर्ल्ड टूरवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कंबोडियाच्या सिहानोकविले (Sihanoukville) बंदरात पोहोचल्यावर प्रवाशांना सांगण्यात आलं की, पुढचा प्रवास आता थांबवण्यात आलाय. अचानक परदेशात राहायचं कुठे, प्रवास कसा करायचा आणि मायदेशी कसं परतायचं, या चिंतेने प्रवासी धास्तावले आहेत.

पाहा व्हिडीओ

प्रवास अर्ध्यावर का थांबला?

पण असं काय घडलं की प्रवास अर्ध्यावरच थांबवावा लागला? कंपनीचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे जहाजाचा खर्च पेलवणं आता शक्य होत नाहीये. मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधनाच्या बाजारात अस्थिरता आलीय, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. एवढी महागडी सेवा जास्त काळ चालवण्याइतके पैसे आता कंपनीकडे उरलेले नाहीत.

घर विकून जहाजावर मुक्काम!

या क्रूझवरचे प्रवासी फक्त सुट्ट्या घालवायला आले नव्हते. अनेकांसाठी हे जहाजच त्यांचं घर होतं. केबिनच्या प्रकारानुसार, कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ राहण्यासाठी त्यांनी १ लाख २० हजार ते ३ लाख ५० हजार डॉलर्स खर्च केले होते. यात निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसोबतच वर्क फ्रॉम होम करणारे तरुणही होते. काहींनी तर स्वतःचं घर आणि मालमत्ता विकून या जहाजावर राहण्याचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे, ऑक्टोबर २०२४ मध्ये उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट बंदरातून 'व्हिला व्ही ओडिसी'ने प्रवास सुरू केला. सुरुवातीला जहाजाच्या दुरुस्तीत थोडा वेळ गेला, पण नंतर प्रवास सुरळीत सुरू झाला. तब्बल ७५० हून अधिक दिवस प्रवास केल्यानंतर, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी थायलंड ओलांडून हे जहाज कंबोडियाच्या सिहानोकविले बंदरात पोहोचलं. जहाजावर २०३ प्रवासी आणि १५६ क्रू मेंबर्स होते. इथून ते व्हिएतनामला जाणार होते. पण पुढचा प्रवास कधी सुरूच झाला नाही.

आशियातल्या वेगवेगळ्या मार्गांवरून जाताना प्रति केबिन महिन्याचा इंधन खर्च १,८०० डॉलर्सवरून थेट ६,००० ते ८,००० डॉलर्सवर पोहोचल्याचा दावा कंपनीने केलाय. खर्च कैकपटीने वाढल्यामुळे सेवा देणं कठीण झालं. जहाजाचा वेग कमी करून किंवा बंदरात जास्त वेळ थांबून खर्च कमी करण्याचा प्रयत्नही झाला. पण तरीही परिस्थिती आटोक्यात आली नाही. हा वाढीव खर्च प्रवाशांवर लादणंही शक्य नव्हतं. त्यानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आला. बुधवार, २८ ऑक्टोबरला सेवा थांबवण्याची घोषणा झाली आणि प्रवाशांना अवघ्या सात तासांत जहाज सोडण्याचे आदेश दिले गेले. एवढ्या कमी वेळात सामान बांधून नवीन जागा शोधताना प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. कंबोडियाच्या स्थानिक प्रशासनानेही या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे.

कंपनी फक्त राहण्याचा खर्च देणार, विमानभाडं नाही!

सध्या कंबोडियात अडकलेल्या प्रवाशांच्या तात्पुरत्या राहण्याचा आणि स्थानिक प्रवासाचा खर्च उचलण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे. पण मायदेशी परतण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानभाडं मात्र कंपनी देणार नाहीये. लाखो रुपये खर्चून समुद्रात राहायला गेलेल्या प्रवाशांना आता स्वतःच्या भविष्याची चिंता सतावतेय. जहाज सध्या बंदरातच उभं आहे. तातडीची कामं करण्यासाठी काही क्रू मेंबर्सना तिथे ठेवलंय. पुढच्या ६० दिवसांत नवीन गुंतवणूक मिळवण्याचा किंवा कंपनीची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगण्यात आलंय. ज्या जहाजावर बसून जग फिरण्याचं स्वप्न प्रवाशांनी पाहिलं होतं, तेच जहाज आता त्यांच्यासाठी अनिश्चिततेचं प्रतीक बनलंय. समुद्रावर लक्झरी आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या लोकांना आता परदेशात नव्याने राहायला जागा शोधावी लागतेय. वर्ल्ड टूरचं स्वप्न असं अर्ध्यावरच मोडेल, याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kylian Mbappe: 'डिक्टेटर मीम' वाद, एम्बाप्पे आणि रिअल माद्रिदने मागितली चीनची माफी
Viral Video: तुटलेल्या वेंडिंग मशीनचं रक्षण करणारे चिनी पोलीस, व्हिडिओ व्हायरल