
Iran-US War Day 12: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बुधवारी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध लवकरच संपू शकतं, असं ते म्हणाले. 'मला वाटेल तेव्हा मी हे युद्ध संपवेन,' असं ट्रंप यांनी स्पष्ट केलंय. Axios या न्यूज वेबसाईटला दिलेल्या एका फोन मुलाखतीत ट्रंप म्हणाले की, 'इराणमध्ये आता टार्गेट करण्यासाठी खरंतर जास्त काही शिल्लक राहिलेलं नाही.' मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना, काही छोटे-मोठे हल्ले अजूनही सुरू आहेत, पण जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा हे युद्ध संपेल, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
इराणमधील अमेरिकेच्या ऑपरेशनचे अनेक हेतू पूर्ण झाले असले तरी, मध्य पूर्वेत हल्ले आणि लष्करी कारवाई अजूनही सुरूच आहे, असे संकेत ट्रंप यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी म्हटलंय की, अमेरिकेसोबत मिळून सुरू असलेलं 'जॉइंट स्ट्राइकिंग कॅम्पेन' जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत सुरूच राहील. या ऑपरेशनसाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही. जोपर्यंत सर्व लक्ष्य पूर्ण होत नाहीत आणि मोहिमेचा अंतिम निकाल समोर येत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहील, असं कॅट्झ यांनी स्पष्ट केलं.
इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की, तेहरान आणि इराणच्या इतर भागांमध्ये हल्ले सतत सुरूच राहतील. त्यांच्या मते, दररोज वेगवेगळ्या लष्करी तळांना लक्ष्य केलं जाईल. या हल्ल्यांमुळे इराणच्या लोकांना देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची राजवट उलथवून टाकण्यासाठी कारवाई करण्याची संधी मिळेल, अशी आशाही कॅट्झ यांनी व्यक्त केली. अर्थात, अंतिम निर्णय इराणच्या लोकांनाच घ्यायचा आहे, असंही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, एक दिवस आधीच ट्रंप यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत युद्ध जवळपास 'पूर्णपणे संपलं' असल्याचं म्हटलं होतं. इराणकडे आता प्रभावी नौदल, मजबूत कम्युनिकेशन सिस्टीम किंवा हवाई दल उरलेलं नाही, असा दावा त्यांनी केला होता. ट्रंप यांच्या मते, इराणची क्षेपणास्त्रं खूप कमी राहिली आहेत आणि त्यांचे ड्रोनही सतत नष्ट केले जात आहेत. लष्करी दृष्ट्या इराणकडे आता खूप कमी साधनं उरली आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणला कोणतीही चिथावणीखोर कारवाई न करण्याचा इशारा दिला. 'जर इराणने काही चुकीचं पाऊल उचललं, तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतील. त्यांनी एखादी मोठी चूक केली, तर जगाच्या नकाशावरून त्या देशाचं नाव पुसलं जाईल,' अशी धमकीच त्यांनी दिली.
मंगळवारी ट्रंप यांनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) इराणने सुरुंग लावल्याच्या बातम्यांवरूनही इराणला इशारा दिला होता. त्यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली. 'जर इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरले असतील, तर ते तात्काळ हटवावेत. नाहीतर, इराणला अशा लष्करी परिणामांना सामोरं जावं लागेल, जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील,' असं ट्रंप यांनी म्हटलंय.