
PM Modi Marathi Speech in Poland : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. पोलंडला 45 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडमध्ये पोहोचले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठी भाषेतून भाषण दिल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पंतप्रधानांचा पोलंडमधील मराठीतील भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय खास कॅप्शन लिहित म्हटले की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा पोलंडमध्ये मराठीत बोलतात....
पुढे फडणवीस यांनी लिहिले आहे की, "दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासित नागरिकांना महाराष्ट्राने दिलेला आश्रय आणि त्यातून महाराष्ट्राचा व भारताचा झळकलेला उदारमतवादी विचार, या साऱ्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार! मैत्री आणि शौर्याचा वारसा! पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांची ऐतिहासिक ७० वर्षे!" या पोस्टमध्ये फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे.
नरेंद्र मोदी मराठीत काय म्हणाले?
पोलंडमध्ये मराठीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या नागरिकांसह मराठी संस्कृतीचा पोलंडच्या नागरिकांना व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्माच्या आचरणाला सर्वाधिक प्राधान्य आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने कोल्हापूरमधील राजघराण्याने पोलंडमधील महिला आणि मुलांना आश्रय देऊ केला होता. तेथेही एक मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. एवढेच नव्हे पोलंडमधील महिलांसह मुलांना त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांनी दिवसरात्र एक करुन काम केले होते." खरंतर, मोदींनी मराठीतून पोलंडमध्ये दिलेल्या भाषणाने भारतीयांची गर्वाने मान उंचावली गेली आहे.
पोलंडमधील आजचा पंतप्रधानांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देखील पोलंडमधील काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी चांसलरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे औपचारिक स्वागत केले जाणार आहे. याशिवाय पोलंडचे पंतप्रधानांसोबत पीएम मोदी यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. द्विपीक्षीय बैठक आणि पत्रकार परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत.
45 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंडमध्ये दाखल
तब्बल 45 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने पोलंडचा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोलंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. पोलंडच्या नागरिकांच्या मनात पंतप्रधान मोदींसाठी खास आदराची भावना आहे. कारण पंतप्रधानांचा गुजरात राज्याची संबंध आहे. गुजरातमधील जामनगरचा आजही पोलंडशी सखोल संबंध आहे. कारण दुसऱ्या महायुद्धावेळी जामनगरचे जाम साहब दिग्विजय सिंह यांनी पोलंडच्या जवळजवळ पाच हजार शरणार्थ्यांना आपल्या राज्यात आश्रय दिला होता. याशिवाय एक हजार शरणार्थ्यांना कोल्हापूरात स्थान दिले होते. यामुळेच पोलंडचे नागरिक आज ते उपकार विसरलेले नाहीत. आजही जामनगरचा राजाला पोलंडमधील नागरिक 'डोबरी महाराजा' च्या नावाने ओखळतात.
आणखी वाचा :
झाकीर नाईक प्रकरणी भारताला पुरावे देण्यास मलेशिया तयार
पंतप्रधान मोदींचा पोलंड-युक्रेन दौरा: काय आहे महत्त्व?