
Pakistan vs Sri Lanka : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी घटनेनंतर परिसर सील केला असून तपास सुरू आहे. या घटनेचा फटका सध्या पाकिस्तान दौर्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघालाही बसला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंका संघातील आठ खेळाडूंनी गुरुवार, 12 नोव्हेंबर रोजी स्वदेश परतण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC)च्या सूत्रांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे. दरम्यान, रावळपिंडी येथे 13 नोव्हेंबरला होणारा दुसरा वनडे सामना रद्द करण्यात आला आहे. याआधी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 6 धावांनी पराभव केला होता.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर श्रीलंका संघाने पाकिस्तान आणि झिंबाब्वेविरुद्ध त्रिकोणी मालिका खेळायची होती. मात्र, आता स्वदेशी परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडू पाठवले जाणार असल्याची माहिती SLCने दिली आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील जवळीक लक्षात घेऊन खेळाडूंनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आणि घरी परतण्याची इच्छा दर्शवली.
या घटनेने क्रिकेटविश्वाला 2009 मधील लाहोर येथील हल्ल्याची आठवण करून दिली आहे. त्या वेळी श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यात महेला जयवर्धने, अजंथा मेंडिस आणि चमिंडा वास हे खेळाडू जखमी झाले होते. त्या घटनेनंतर जवळपास 10 वर्षे कोणताही विदेशी संघ पाकिस्तान दौर्यावर गेला नव्हता, आणि पाकिस्तानला आपले सामने यूएईसारख्या तटस्थ स्थळांवर खेळावे लागले. 2019 मध्ये श्रीलंका संघानेच पाकिस्तान दौर्यावर परत येत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा पाकिस्तानमध्ये आणण्याची संधी दिली होती.
श्रीलंका संघाचा हा दौरा 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. दुसरा सामना 13 नोव्हेंबरला रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता, मात्र आता तो सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. या घटनाक्रमामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लाजिरवाणी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.