
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभर संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठाम आरोप करण्यात येत असून, भारत सरकारकडूनही कठोर भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या अणुयुद्धसदृश वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (FAS) या संस्थेने 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, पाकिस्तानकडे सुमारे 170 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे. 2024 मध्ये ही संख्या 172 पर्यंत पोहोचली असून, भारताकडे सध्या 180 अण्वस्त्रे असल्याचे म्हटले गेले आहे. आशियाई उपखंडातील या शस्त्रस्पर्धेमुळे जागतिक अस्वस्थता अधिकच वाढली आहे.
अहवालात दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तान दरवर्षी 14 ते 27 अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता विकसित करत आहे. यासाठी तो अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेल्या विखंडन सामग्रीचं उत्पादन सातत्याने वाढवत आहे. आर्थिक अडचणींमध्येही त्याचा अणु कार्यक्रम थांबलेला नाही, हे विशेष धक्कादायक आहे.
FAS च्या माहितीनुसार, पाकिस्तानने आपली अण्वस्त्रे अत्यंत गोपनीय पद्धतीने हवाई दलाच्या दोन प्रमुख तळांवर साठवली असल्याची शक्यता आहे. ही तळं म्हणजे:
आणखी एक अज्ञात एअरबेस, जिथे Mirage III आणि Mirage V सारखी अणुबॉम्ब वाहून नेणारी विमाने तैनात आहेत. याशिवाय पाकिस्तानकडे अब्दाली, गझनवी, शाहीन-I/A, नस्र, घौरी, आणि शाहीन-II यांसारखी सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहेत, ज्या जमिनीवरून अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत.
हे सगळं घडत असताना पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, वाढलेली बेरोजगारी, आणि जगाच्या पुढे हात पसरायला लावणारी आर्थिक परिस्थिती आहे. IMF, जागतिक बँक आणि मुस्लिम देशांकडून मिळालेली मदतही तात्पुरती ठरत असून, सामान्य जनता दररोजच्या गरजा भागवण्यातच हैराण आहे. अशा वेळी अणुशस्त्र विकासावर भर देणं हे धोकादायक आणि विरोधाभासी आहे.
भारताने पाकिस्तानच्या या हालचालींवर सजग नजर ठेवली असून, संरक्षण, गुप्तचर आणि परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अणुयुद्धाचा कोणताही विचार प्रचंड विनाशकारी ठरू शकतो, याचे भान ठेवणे दोन्ही देशांसाठी गरजेचे आहे.