
लंडन ः तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या जगात वीज गेल्यास संपूर्ण जीवन विस्कळीत होते. स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या काही भागांमध्ये सोमवारी अचानक झालेल्या ब्लॅकआउटमुळे हाहाकार माजला. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला. विमानसेवाही पूर्णपणे विस्कळीत झाल्या. सर्वत्र अंधार पसरला, जनजीवन ठप्प झाले. बातमी लिहिताना वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर लगेच स्पेन आणि पोर्तुगाल सरकारांनी आणीबाणीच्या कॅबिनेट बैठका बोलावल्या. फ्रान्सचा सीमावर्ती भागही काही काळ या वीज संकटाने प्रभावित झाला. पोर्तुगालच्या REN या कंपनीने संपूर्ण आयबेरियन द्वीपकल्पात वीज पुरवठा खंडीत झाल्याची आणि फ्रान्सच्या एका भागातही त्याचा परिणाम झाल्याची पुष्टी केली.
स्पॅनिश ग्रिड ऑपरेटर रेड इलेक्ट्रिकाने सांगितले की ते प्रादेशिक ऊर्जा कंपन्यांसोबत मिळून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत. REN च्या प्रवक्त्याने सांगितले की युरोपीय ऊर्जा उत्पादक आणि ऑपरेटर यांच्या समन्वयाने वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
स्पॅनिश रेडिओच्या वृत्तानुसार, मॅड्रिडच्या मेट्रो स्थानकांना अंशतः रिकामा करण्यात आले. शहराच्या मध्यभागी ट्रॅफिक सिग्नल बंद पडल्याने मोठा जाम झाला. कॅडर सेर रेडिओ स्टेशनने सांगितले की लोक कार्यालयाबाहेर उभे होते, तर पोलिस दल वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तैनात होते.
रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश दूतावास असलेल्या मॅड्रिडच्या प्रमुख टॉवरपैकी एक टॉवर रिकामा करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी लोकांना मेट्रो कार आणि लिफ्टमध्ये अडकल्याच्या बातम्या दिल्या.
पोर्तुगाल पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण देशात ट्रॅफिक सिग्नल बंद पडले, लिस्बन आणि पोर्टोमध्ये मेट्रो सेवा पूर्णपणे बंद पडल्या आणि रेल्वेगाड्याही चालत नव्हत्या. लिस्बनच्या मेट्रोपोलिटानो डी लिस्बोआने मेट्रो गाड्या रुळांवर अडकल्याची पुष्टी केली.
टॅप एअर पोर्तुगालच्या एका सूत्राने सांगितले की लिस्बन विमानतळ बॅकअप जनरेटरवर चालत आहे. स्पेनच्या विमानतळ व्यवस्थापन कंपनी AENA ने देशभरात विमानांना उशीर झाल्याची पुष्टी केली.
फ्रान्सच्या ग्रिड ऑपरेटर आरटीईने सांगितले की तेथेही थोड्या वेळासाठी वीज गेली होती, परंतु आता पुरवठा पूर्ववत झाला आहे. संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे.
आतापर्यंतच्या वृत्तानुसार, वीज संकटामागे तांत्रिक बिघाड किंवा नेटवर्कमधील बिघाडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून लवकरच सविस्तर अहवाल येण्याची अपेक्षा आहे.