कुस्तीपटू विनेश फोगट हिचे पॅरिस ऑलिम्पिकमधून वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात येण्याची शक्यताय. 50 किलो गटात स्पर्धा करणाऱ्या विनेशचे वजन दुसऱ्या दिवशी मर्यादेपेक्षा जास्त आढळले. नियमांचे उल्लंघन झाल्याने तिला स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते.
Vinesh Phogat Paris Olympics : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
नेमका काय घडला प्रकार?
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
अपराजित यूई सुसाकीला विनेश फोगाटने लोळवलं होतं
विनेश फोगटनं उपांत्य फेरीत जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा 3-2 असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे. विनेश फोगट आणि युई सुसाकी हिचा सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा अनेकांना युई सुसाकी ही विजयाची प्रमुख दावेदार वाटत होती. युई सुसाकीनं तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही पराभव स्वीकारला नव्हता. राष्ट्रीय करिअरमध्ये तिला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. जपानच्या इरी युकी हिनं तिचा पराभव केला होता. मात्र, युई सुसाकीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव झाला नव्हता विनेश फोगटनं यूकी सुसाकीला 3-2 असं पराभूत करत इतिहास रचला. युई सुसाकीला पराभूत करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत कुणालाही जमलेलं नव्हतं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिनं ती कामगिरी करुन दाखवली होती. यानंतर विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद दिसत होता. परंतु आता विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याने सर्वत्र निराशा पसरली आहे.