
न्यूयॉर्क पोलिस विभागाच्या (NYPD) दोन गुप्तहेरांनी एका २४ वर्षीय महिलेचे प्राण वाचवले आहेत. १ नोव्हेंबरला हॅलोवीन नाईट फेस्टिव्हलनंतर मॅनहॅटन चेंबर स्टेशनवर चुकून सबवे ट्रॅकवर पडलेल्या या महिलेने देवदूतासारखा (एंजल) पोशाख परिधान केला होता.
या घटनेचा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) सारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोन NYPD गुप्तहेर चार फूट खोल रेल्वे ट्रॅकवर उडी मारताना दिसत आहेत. काही प्रवाशांनी एका महिलेला ट्रॅकवर पडताना पाहिले, त्यानंतर लगेचच त्यांनी या अधिकाऱ्यांना सावध केले. त्यावेळी इलेक्ट्रिक थर्ड रेलजवळ वेगाने काम करत असलेल्या गुप्तहेर ब्रेट डेव्हाईन आणि कार्मेलो स्ट्राकुझी यांनी बेशुद्ध पडलेल्या महिलेला तपासले आणि रेल्वे येण्यापूर्वी तिला प्लॅटफॉर्मवर उचलून घेतले.
हे सर्व दृश्य एका अधिकाऱ्याच्या बॉडीकॅममध्ये कैद झाले आहे. जेव्हा प्लॅटफॉर्मवर रेल्वे येत असल्याची घोषणा झाली आणि बोगद्यात हेडलाईट्स दिसल्या, तेव्हा तो आपल्या जोडीदारासह प्लॅटफॉर्मच्या कडेला धावून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला २४ वर्षीय न्यूयॉर्कची रहिवासी असून तिचे नाव अधिकाऱ्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. हॅलोवीन सेलिब्रेशनवरून पहाटे परतत असताना ती चुकून ट्रॅकवर पडली, ज्यात तिला किरकोळ दुखापत झाली.
सुट्टीच्या दिवशी संपूर्ण शहरातून येणाऱ्या कॉल्समुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा आधीच व्यस्त होत्या. अशा परिस्थितीत गुप्तहेर ब्रेट डेव्हाईन आणि कार्मेलो स्ट्राकुझी यांना एका प्रवाशाने मदत केली. त्यांनी त्या महिलेला स्टेशनच्या पायऱ्यांवरून रस्त्यावर आणले. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर किरकोळ दुखापतींवर उपचार करण्यात आले. अहवालानुसार, ती आता बरी होत आहे.
ही घटना १ नोव्हेंबरच्या रात्री अंदाजे १ वाजता घडली असली तरी, १४ नोव्हेंबरला न्यूयॉर्क पोस्टवर या बचाव कार्याचा बॉडीकॅम व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
Video shows moment hero NYPD cops rescue woman in angel wings from subway tracks https://t.co/cuxBZvkmHv https://t.co/rkiNbZyRjl
— New York Post (@nypost) November 14, 2026
या त्वरित कारवाईबद्दल आणि महिलेचा जीव वाचवल्याबद्दल न्यूयॉर्क पोलिस विभागाच्या (NYPD) गुप्तहेरांचे नंतर डिटेक्टिव्हज एंडोवमेंट असोसिएशनकडून कौतुक करण्यात आले. हॅलोवीनशी संबंधित घटनांमुळे रुग्णवाहिका येण्यास उशीर होत होता, म्हणून अधिकाऱ्यांनी वेळ न घालवता त्या महिलेला त्यांच्याच वाहनातून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
या व्हिडीओमध्ये अधिकारी महिलेला सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहेत आणि त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच समोरच्या एक्सप्रेस ट्रॅकवर एक रेल्वे स्टेशनमध्ये दाखल होते.
NYPD चे गुप्तहेर ब्रेट डेव्हाईन आणि कार्मेलो स्ट्राकुझी, जे त्यावेळी ओव्हरटाईम करत होते, त्यांनी चेंबर स्ट्रीट स्टेशनवर एका महिलेला रेल्वे ट्रॅकवरून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले. नंतर त्यांनी येणाऱ्या रेल्वेच्या वेळेसची ती धडधड वाढवणारी परिस्थिती कथन केली.
न्यू यॉर्क पोस्टनुसार, २०१२ मध्ये पोलिस दलात रुजू झालेल्या डेव्हाईनने सांगितले की, रेल्वे ट्रॅकची खोली त्याच्या अंदाजापेक्षा जास्त होती. तरीही, इलेक्ट्रिक थर्ड रेलजवळ बेशुद्धावस्थेत पडलेल्या महिलेला पाहून त्याने लगेचच खाली उडी मारली.
“मी तिच्या खांद्याला हलवून ती उठतेय का ते पाहिलं, पण ती काहीच हलत नव्हती,” डेव्हाईनने आठवण सांगताना म्हटले. गरज पडल्यास रेल्वेला इशारा देण्यासाठी त्याने आपल्या जोडीदाराकडे फ्लॅशलाईट मागितल्याचेही त्याने सांगितले.
दुसरीकडे, डेव्हाईनच्या एक वर्ष आधी म्हणजेच २०११ मध्ये NYPD मध्ये दाखल झालेल्या स्ट्राकुझीने सांगितले की, बोगद्यात दिसणाऱ्या लाईट्स आणि रेल्वे येत असल्याच्या स्टेशनवरील घोषणेने त्यांना काही सेकंदातच निर्णय घेण्यास भाग पाडले.
“मला बोगद्याच्या शेवटी लाईट्स दिसल्याचं आठवतं. त्यावेळी माझ्या मनात आलं की, 'अरे देवा... आता आपल्याला थोडी घाई करावी लागेल,'” स्ट्राकुझीने सांगितले.
दोन्ही NYPD गुप्तहेरांनी आभार मानले की ते वेळेवर स्टेशनवर उपस्थित होते आणि महिलेला मदत करू शकले. कार्मेलो स्ट्राकुझी म्हणाला की, ते मदत करू शकले याचा त्याला आनंद आहे, पण जर ते तिथे नसते तर काय झाले असते, याचा विचारही तो करू शकत नाही.