World's First Car : आजच्या सायकलच्या स्पीडने धावायची ही कार; इतिहासातील पहिल्या पेट्रोल कारला किती चाकं होती?

Published : Nov 20, 2026, 03:54 PM IST
First Car

सार

इतिहासाची पाने उलटली की अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आजच्या काळात मिळणाऱ्या आलिशान सुविधा पूर्वीच्या गाड्यांमध्ये नव्हत्या. जगातील पहिली कार कोणती होती आणि तिची काय वैशिष्ट्ये होती हे जाणून घेऊया.

नवी दिल्ली : आज जगात अनेक प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या कार्स मार्केटमध्ये आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन आणि आलिशान फीचर्स असलेल्या कार्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, जगातील पहिली आधुनिक कार कशी होती? तिला किती चाकं होती आणि तिचा स्पीड किती होता? जाणून घेऊया.

जगातील पहिली कार कोणती?

जर्मन इंजिनियर कार्ल बेंझ (Karl Benz) यांनी बनवलेल्या बेंझ पेटंट-मोटरवॅगन (Benz Patent-Motorwagen) ला इतिहासातील पहिली पेट्रोल कार मानलं जातं. १८८६ मध्ये या कारला पेटंट मिळालं होतं.

फक्त तीन चाकांची कार

जगातील पहिली पेट्रोल कार, बेंझ पेटंट-मोटरवॅगनमध्ये फक्त तीन चाकं होती. कार्ल बेंझ यांनी चार चाकांऐवजी तीन चाकांची डिझाईन निवडली होती. गाडीचे वजन कमी करण्यासोबतच ती वळवणे सोपे होईल, असा त्यांचा अंदाज होता. या कारच्या पुढच्या बाजूला एक लहान स्टीयरिंग व्हील आणि मागच्या बाजूला सायकलप्रमाणे स्पोक्स असलेली दोन मोठी चाके होती. या चाकांना सॉलिड रबर टायर्स बसवण्यात आले होते.

टॉप स्पीड फक्त १६ किमी प्रतितास

आजच्या कार्सच्या वेगाची तुलना करता पहिल्या कारचा स्पीड खूपच कमी होता. बेंझ मोटरवॅगनच्या सुरुवातीच्या मॉडेलचा टॉप स्पीड ताशी १६ किलोमीटर होता. त्यानंतर सुधारित मॉडेल्समध्ये हा वेग ताशी १९ ते २० किलोमीटरपर्यंत वाढला. आजच्या सायकलच्या स्पीडने ती कार धावायची.

जगातील पहिल्या पेट्रोल कारमध्ये ९५४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर, फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन बसवले होते. विशेष म्हणजे हे इंजिन केवळ ०.६७ ते ०.७५ हॉर्सपॉवर (HP) ताकद निर्माण करत होते. म्हणजेच या इंजिनची ताकद एका घोड्याच्या ताकदीपेक्षाही कमी होती. इंजिन कारच्या मागील बाजूस बसवले होते. गाडीचे वजन कमी ठेवण्यासाठी तिचा सांगाडा हलक्या स्टीलच्या ट्युब्सनी बनवला होता.

या ऐतिहासिक कारमध्ये आजच्या गाड्यांसारखे गोल स्टीयरिंग व्हील नव्हते. त्याऐवजी मध्यभागी एका सरळ रॉडला टिलर-स्टाईल हँडल बसवले होते. या हँडलद्वारे पुढील एक चाक फिरवून कार नियंत्रित केली जात होती. स्टीयरिंग आजच्या रिक्षासारखे होते. १८८८ मध्ये कार्ल बेंझ यांच्या पत्नी बर्था बेंझ (Bertha Benz) यांनी याच कारचे सुधारित मॉडेल वापरून १०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास केला होता. यातून त्यांनी जगाला दाखवून दिलं की पेट्रोल कार केवळ प्रयोगापुरती मर्यादित नसून लांबच्या प्रवासासाठीही उपयुक्त ठरू शकते.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bondi Terror Attack: बाँडी बीच हल्ल्यातील हिरोंचं बहरलं प्रेम, जिथं वाचवले प्राण तिथंच अडकले विवाहबंधनात
Air India: एअर इंडियाला २२,००० कोटींचा फटका, पाकिस्तानचाही यात मोठा वाटा