पाऊस पडला की नद्यांना पूर येतो, हे तर आपण नेहमीच पाहतो. पण नेपाळमध्ये काहीतरी वेगळंच घडलंय. तिथे पाऊस न पडताच नदीला महापूर आला. नेपाळमध्ये नेमकं काय घडलं आणि अचानक हा पूर का आला?
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुराला पाऊस जबाबदार नाही. साधारणपणे, मुसळधार पावसाचा इशारा मिळाला की लोक सावध होतात. पण इथे पावसाचा एक थेंबही न पडता नद्यांनी रौद्ररूप धारण केलं आणि गावं पाण्याखाली गेली. या विचित्र आपत्तीमागे कारण आहे हिमालयात झालेला एक मोठा बदल. सुमारे ५००० मीटर उंचीवर असलेल्या लांगटांग पर्वतरांगेतील एक प्रचंड हिमनदी (ग्लेशियर) आणि बाजूचा कडा कोसळला. हा ढिगारा इतक्या वेगाने आणि प्रचंड प्रमाणात खाली आला की भूकंपमापकावरही त्याची नोंद झाली. इथूनच या अनपेक्षित प्रलयाची सुरुवात झाली.
23
नैसर्गिकरित्या तात्पुरतं धरण तयार
डोंगरावरून कोसळलेले हजारो टन बर्फ, दगड आणि माती थेट दरीतल्या नदीत पडले आणि क्षणात नदीचा प्रवाह पूर्णपणे अडला. यामुळे, तिथे नैसर्गिकरित्या एक तात्पुरतं धरण तयार झालं. वरून येणारं पाणी साठून काही मिनिटांतच एका मोठ्या जलाशयासारखं दिसू लागलं आणि प्रचंड दाब वाढला. पाण्याच्या रेट्यामुळे माती आणि दगडांचं हे धरण अचानक फुटलं आणि चिखलाचा लोंढा त्सुनामीसारखा वेगाने खाली आला. फक्त अर्ध्या तासात नदीची पातळी तब्बल दहा मीटरने वाढली. या प्रवाहापुढे नदीकाठची घरं, पूल आणि इतर बांधकामं टिकू शकली नाहीत आणि वाहून गेली. काय होतंय हे कळायच्या आतच सगळी गावं चिखलमय झाली.
33
मूळ कारण ग्लोबल वॉर्मिंग
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, या आपत्तीचं खरं मूळ कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे. हिमालयातील तापमानवाढीमुळे हजारो वर्षांपासून दगडांना गोंदासारखं घट्ट धरून ठेवणारा पर्माफ्रॉस्ट (Permafrost) म्हणजे कायमस्वरूपी गोठलेला बर्फाचा थर वितळत आहे. यामुळे पर्वतांची पकड कमकुवत होत आहे आणि वरचे ग्लेशियर कधीही घसरतील इतके अस्थिर झाले आहेत. पाऊस नाही, तर केवळ उष्णता वाढल्याने पर्वतांचा आतला भाग कमकुवत झाल्यामुळे हा महाप्रलय घडला. भविष्यात पाऊस नसतानाही हिमालयात अशा अचानक येणाऱ्या संकटांची शक्यता आहे, असा गंभीर इशारा या घटनेने दिला आहे.