Nepal Flood : नेपाळमध्ये प्रलयाचं थैमान, जीवाच्या आकांताने पळणाऱ्या कामगाराचा थरारक व्हिडिओ

Published : Aug 27, 2026, 11:18 AM IST
Nepal Flood : नेपाळमध्ये प्रलयाचं थैमान, जीवाच्या आकांताने पळणाऱ्या कामगाराचा थरारक व्हिडिओ

सार

नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या महापूरात आणि भूस्खलनात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकं ढिगाऱ्याखाली शोध घेत असून अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.

मुंबई : नेपाळ-तिबेट सीमेजवळ अचानक आलेल्या महापूरात आणि भूस्खलनामुळे १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता असून, बचाव पथकं चिखल आणि ढिगाऱ्याखाली त्यांचा शोध घेत आहेत.

एका कामगाराने तर आपला जीव वाचवतानाचा एक थरारक व्हिडिओ स्वतःच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो आणि त्याचे सहकारी एका बांधकाम साईटवर होते, तेव्हा अचानक चिखल-पाण्याचा प्रचंड लोंढा त्यांच्या दिशेने आला. जीव वाचवण्यासाठी सगळेच सैरावैरा पळू लागले. या घटनेनंतर एका हेलिकॉप्टरने आपली सुटका केली, असं त्या कामगाराने नंतर सांगितलं.

पुरापासून पळाल्यानंतर हेलिकॉप्टरने सुटका झाल्याचे कामगाराने सांगितले

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही कामगार हेल्मेट आणि ऑरेंज सेफ्टी वेस्ट घालून नदीच्या काठावर उभे असलेले दिसतात. दूरवर धूळ आणि पाणी उडताना दिसतं आणि काही क्षणातच नदीतून पाण्याचा एक मोठा लोंढा वेगाने येताना दिसतो. हे पाहताच कामगार जीव वाचवण्यासाठी उंच जागेकडे धावू लागतात. काही क्षणांतच चिखलाचा लोंढा सगळं काही उद्धवस्त करत पुढे जातो.

या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांनी आपला भयानक अनुभव सांगितला आहे. ६८ वर्षांचे केशव प्रसाद बराल यांनी आपल्या डोळ्यादेखत पत्नीला चिखलात वाहून जाताना पाहिलं. "चिखलाचा एक मोठा लोंढा थेट आमच्या दिशेने येत होता. तो जसजसा जवळ येत होता, तसतसा तो अधिकच उंच होत होता. जेव्हा तो आमच्या घरात शिरला, तेव्हा मी माझ्या पत्नीचा हात धरून तिला टेरेसवर नेण्याचा प्रयत्न केला. पण ती चिखलात वाहून गेली," असं त्यांनी रॉयटर्सला सांगितलं. "चार-पाच तासांनंतर एका हेलिकॉप्टरने मला वाचवलं. माझी पत्नी अजूनही त्या चिखलाखाली कुठेतरी आहे. ती आता नाही राहिली."

बिबेक कुमाल नावाचा आणखी एक जण आंब्याच्या झाडात अडकल्यामुळे वाचला. "मी पळायला सुरुवात केली. त्यानंतर जणू भूकंप व्हावा तसा पाण्याचा लोंढा आला," असं तो म्हणाला.

नेपाळमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत: +९७७ ९८५ १३१ ६८०७ आणि +९७७ ९७० ९१० ७५००. हे नंबर व्हॉट्सॲपवरही उपलब्ध आहेत.

या महापुराचं नेमकं कारण काय आहे, याचा तपास अजूनही सुरू आहे. बर्फाचा किंवा खडकांचा कडा कोसळल्याने किंवा हिमनदी वितळल्यामुळे हे घडलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. काही अधिकाऱ्यांनी भूकंपाची शक्यता वर्तवली आहे, तर काही जण हिमनदीचा तलाव फुटल्यामुळे (glacial lake outburst flood) पूर आला का, याचा तपास करत आहेत.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय