Nepal Floods : नेपाळमध्ये जलप्रलय! कैलास मानसरोवरला निघालेल्या १०० भारतीयांसह ४०० भाविक बेपत्ता

Published : Aug 26, 2026, 08:42 PM IST
Nepal Floods : नेपाळमध्ये जलप्रलय! कैलास मानसरोवरला निघालेल्या १०० भारतीयांसह ४०० भाविक बेपत्ता

सार

Nepal Flash Flood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेला निघालेले १०० हून अधिक भारतीयांसह जवळपास ४०० भाविक बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं असून, मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

काठमांडू : नेपाळ-चीन सीमेला लागून असलेल्या रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी अचानक महापूर आला. तिबेटच्या सीमेवरील या भागातील रस्ते वाहून गेले आणि मोठं नुकसान झालं. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेले १०० हून अधिक भारतीयांसह जवळपास ४०० भाविकांचा रसुवागढी चेकपॉईंटवर संपर्क तुटला आहे.

३८० हून अधिक प्रवासी बेपत्ता

'काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार, बुधवारी एकूण ३८४ भाविक सीमा ओलांडणार होते. यात २९१ परदेशी आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश होता. काही जणांचा अपवाद वगळता, यापैकी बहुतांश भाविकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. हे सर्व भाविक वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीचे ग्राहक आहेत.

नेपाळच्या पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील भोटे कोसी नदीला आलेल्या या पुरामुळे 'बेपत्ता' झालेल्या परदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा (NRIs) समावेश आहे. पर्यटन आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचावकार्य सुरू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाविकांशी संपर्क साधून ते सुरक्षित आहेत की नाही, याची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेपाळ पर्यटन मंडळाने (NTB) 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) दिलेल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, "बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रसुवातील भोटे कोसी नदीला अचानक पूर आल्यानंतर, पर्यटन मंडळ, टुरिस्ट पोलीस आणि इतर संस्था प्रभावित भागातील पर्यटकांची माहिती घेत आहेत."

"पर्यटन आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून मिळालेल्या प्राथमिक नोंदीनुसार, २९१ परदेशी आणि ९३ नेपाळी नागरिकांसह एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती आहे. या माहितीची पडताळणी ट्रॅव्हल एजन्सी, गाईड, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने केली जात आहे," असंही पर्यटन मंडळाने सांगितलं.

काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळी लष्कराला मोठ्या प्रमाणावर बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. यासाठी १४ हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात आहे. याशिवाय, नेपाळ-चीन सीमेजवळील तिमुरे येथे तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे नऊ जवानही बेपत्ता आहेत.

पुरामुळे मोठं नुकसान, अनेक भाग दुर्गम

स्थानिक बाजारपेठा आणि सुरक्षा चौक्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्रिशूली नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना नदीपासून दूर आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पूर जसजसा पुढे जाईल तसतसा त्याचा जोर कमी होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नुवाकोट जिल्ह्यातून आलेल्या ड्रोन फुटेजमध्ये पुरामुळे झालेलं भीषण नुकसान स्पष्ट दिसत आहे. ज्या ठिकाणी ही आपत्ती घडली, तिथले संपर्क रस्ते वाहून गेल्याने तो भाग पूर्णपणे दुर्गम झाला आहे.

तिबेटमध्ये दरड कोसळल्याने पूर आल्याचा संशय

या पुराचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. पण, नेपाळच्या पूर अंदाज विभागाला मिळालेल्या अनौपचारिक माहितीनुसार, तिबेटमध्ये दरड कोसळल्याने एक नदी अडली असावी आणि नंतर ते पाणी वेगाने बाहेर पडल्याने हा पूर आला असावा, असं काठमांडू पोस्टने म्हटलं आहे. भोटेकोसी नदीला आलेल्या या अचानक पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.

पंतप्रधान बालेंद्र शाह यांनीही या पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या उपाययोजना ठरवण्यासाठी एक बैठक बोलावली आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nepal Flood : 'भारत तुमच्या पाठीशी'; पंतप्रधान मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन, मदतीचं आश्वासन
Nepal Floods : रौद्ररूप धारण केलेल्या नदीचा थरार, नेपाळमध्ये महाप्रलय, ७ जणांचा मृत्यू