Meta New Program: मेटाने 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' नावाची एक नवीन योजना आणली आहे. इतर प्लॅटफॉर्मवरील क्रिएटर्सना फेसबुककडे आकर्षित करणं हा याचा उद्देश आहे. यातून महिन्याला 2.7 लाख रुपयांपर्यंत कमाई करता येणार आहे.
कॅलिफोर्नियातील मेटा कंपनीने फेसबुकवर अधिक कंटेंट क्रिएटर्सना आणण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की, जे क्रिएटर्स इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूबवर सक्रिय आहेत, ते फेसबुकवर कंटेंट शेअर करून चांगली कमाई करू शकतात. क्रिएटर्सना पुन्हा फेसबुककडे वळवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या नवीन योजनेला 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' असं नाव दिलं आहे.
23
सतत सक्रिय राहणं गरजेचं
या योजनेत सहभागी होण्यासाठी, तुमच्याकडे इतर सोशल मीडियावर किमान 20 हजार फॉलोअर्स असणं आवश्यक आहे. पात्र क्रिएटर्सना सुरुवातीला 100 डॉलर्स (सुमारे 9,000 रुपये) मिळतील. यामुळे छोट्या क्रिएटर्सनाही कमाईची संधी मिळेल. फॉलोअर्सच्या संख्येनुसार कमाई वाढेल. 1 लाख फॉलोअर्स असणाऱ्यांना महिन्याला सुमारे 1,000 डॉलर्स (90,000 रुपयांपेक्षा जास्त) मिळतील. तर, 10 लाख किंवा त्याहून अधिक फॉलोअर्स असल्यास, तुम्ही महिन्याला 3,000 डॉलर्स (सुमारे 2.7 लाख रुपये) कमवू शकता. पण ही कमाई मिळवण्यासाठी सतत सक्रिय राहणं गरजेचं आहे.
33
योजनेत सहभागी होण्यासाठीच्या अटी
या योजनेत काही अटी आहेत. तुम्हाला 30 दिवसांत किमान 15 ओरिजनल रील्स पोस्ट कराव्या लागतील, आणि त्या किमान 10 वेगवेगळ्या दिवशी पोस्ट केलेल्या असाव्यात. ही प्रोत्साहन रक्कम फक्त तीन महिन्यांसाठी दिली जाईल. त्यानंतर, फेसबुकच्या इतर कमाईच्या योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, 'क्वालिफाईड व्ह्यूज' नावाच्या नवीन मेट्रिकद्वारे, खऱ्या व्ह्यूजच्या आधारावर कमाई मोजली जाईल. क्रिएटर्सना जास्त रीच मिळवण्यासाठी मेटा मदत करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.