Kylian Mbappe: 'डिक्टेटर मीम' वाद, एम्बाप्पे आणि रिअल माद्रिदने मागितली चीनची माफी

vivek panmand   | CMS
Published : Oct 28, 2026, 08:54 PM IST
Kylian Mbappe: 'डिक्टेटर मीम' वाद, एम्बाप्पे आणि रिअल माद्रिदने मागितली चीनची माफी

सार

फ्रान्सचा कर्णधार आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे एका मीमवर कमेंट करून मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे चीन चांगलाच संतापला आहे. वाढता वाद पाहून एम्बाप्पे आणि रिअल माद्रिदने चीनची जाहीर माफी मागितली आहे.

'डिक्टेटर मीम' (हुकूमशहा मीम) वादात अडकल्यामुळे चीन किलियन एम्बाप्पेवर चांगलाच भडकला आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आणि रिअल माद्रिदच्या या स्टार स्ट्रायकरसोबतचे सर्व व्यावसायिक करार मोडण्याची घोषणा चीनच्या तीन मोठ्या कंपन्यांनी केली आहे. यात ईस्टड्रॉप बेव्हरेज (पेय कंपनी), मेंगनिऊ (दुग्धजन्य पदार्थ) आणि शांघाय मिल्कग्राउंड फूड टेक या कंपन्यांचा समावेश आहे. एवढंच नाही, तर चीनची सरकारी प्रसारण संस्था 'चायना मीडिया ग्रुप'ने ला लीगा (LaLiga) सामन्यांचे प्रक्षेपण आणि एम्बाप्पेच्या जाहिराती दाखवणेही थांबवले आहे. त्यामुळे हा वाद आता फक्त एका खेळाडूच्या वक्तव्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. याचा मोठा फटका रिअल माद्रिद, ला लीगा आणि चीनमधील लाखो फुटबॉल चाहत्यांच्या व्यावसायिक आणि क्रीडा संबंधांना बसू शकतो.

एम्बाप्पेसोबतच रिअल माद्रिदनेही मागितली माफी

मीमवरून वाद वाढल्यानंतर एम्बाप्पेने माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'माझी ती कमेंट योग्य नव्हती. चीनमधील अनेक लोक आणि जगभरात राहणाऱ्या चिनी समुदायाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत, हे मला आता समजतंय. ज्यांना माझ्या बोलण्यामुळे वाईट वाटलं, त्या सर्वांची मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. चीनचे लोक आणि त्यांच्या इतिहासाबद्दल मला खूप आदर आहे. जे काही घडलं, त्याबद्दल मला खरोखरच खेद वाटतो.' रिअल माद्रिदनेही एक निवेदन जारी करत म्हटलंय, 'आमचा खेळाडू किलियन एम्बाप्पेच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे चीनच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी रिअल माद्रिद माफी मागत आहे. चीन, तिथला इतिहास, संस्कृती आणि नागरिकांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. तसेच, रिअल माद्रिदवर प्रेम करणाऱ्या चीनमधील लाखो चाहत्यांचाही आम्ही सन्मान करतो.'

नेमका वाद काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा सगळा वाद सुरू झाला. एम्बाप्पेला त्याच्या आवडत्या मीमबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना या स्टार फुटबॉलपटूने सांगितलं की, त्याचा आवडता मीम एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चीनच्या हुकूमशहासारखी दिसत होती. यानंतर एका फोटोमध्ये चीनचे संस्थापक नेते माओ झेडोंग यांच्या चेहऱ्यावर एम्बाप्पेचा चेहरा लावलेला दिसला. एम्बाप्पेने थेट माओ झेडोंग यांचं नाव घेतलं नसलं, तरी तो फोटो चिनी नेत्याला उद्देशूनच बनवला होता, हे स्पष्ट होतं. यानंतर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीकेची झोड उठली. चीनमध्ये माओ यांच्यावर विनोद करणं हा अत्यंत संवेदनशील विषय मानला जातो, त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एम्बाप्पेने नंतर माफी मागितली. आपलं वक्तव्य चुकीचं होतं हे मान्य करत, त्याने चीन आणि जगभरातील चिनी समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त केला. पण तरीही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: तुटलेल्या वेंडिंग मशीनचं रक्षण करणारे चिनी पोलीस, व्हिडिओ व्हायरल
Baby With Thick Mustache: जन्मताच बाळाला जाडजुड मिशी? इक्वाडोरच्या या व्हायरल व्हिडीओने उडवली खळबळ