
वॉशिंग्टन : १३ जूनपासून इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेले युद्ध (इजरायल-इराण युद्ध) थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घोषणा केली आहे की इस्रायल आणि इराण दोन्ही पूर्ण युद्धविराम करारावर पोहोचले आहेत. प्रथम इराण आणि त्यानंतर १२ तासांनी इस्रायल युद्ध थांबवेल. ट्रम्प म्हणाले की १२ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता संपेल. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना इराणने युद्धविरामाचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. आधी इस्रायलने हल्ले थांबवावेत असे सांगितले आहे.
ट्रुथ सोशलवर पोस्ट करून ट्रंप म्हणाले, "सर्वांना अभिनंदन! इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम होण्याबाबत पूर्ण सहमती झाली आहे."
ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांनी त्यांची "अंतिम मोहिम" पूर्ण केल्यानंतर सुमारे ६ तासांनी युद्धविराम सुरू होईल. इराण युद्धविराम करेल आणि त्यानंतर १२ तासांनी इस्रायल युद्ध थांबवेल. युद्ध अधिकृतपणे २४ तासांनी संपले असे मानले जाईल.
ट्रम्प म्हणाले, "१२ दिवसांच्या युद्धाच्या अधिकृत समाप्तीचे जगभर स्वागत केले जाईल. प्रत्येक युद्धविरामादरम्यान, दुसरा पक्ष शांततापूर्ण आणि आदरपूर्ण राहील. मी दोन्ही देशांचे, इस्रायल आणि इराणचे अभिनंदन करू इच्छितो."
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याबद्दल इस्रायल आणि इराणचे कौतुक केले. ते म्हणाले, "हे असे युद्ध होते जे वर्षानुवर्षे चालू शकले असते. संपूर्ण मध्यपूर्व नष्ट करू शकले असते, पण तसे झाले नाही आणि कधीही होणार नाही! देव इस्रायलला आशीर्वाद देवो, देव इराणला आशीर्वाद देवो, देव मध्यपूर्वला आशीर्वाद देवो, देव अमेरिकेला आशीर्वाद देवो, आणि देव जगाला आशीर्वाद देवो!"
कतारच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी इस्रायल आणि इराणमधील संघर्षात अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धविरामाला तेहरानची सहमती मिळवून दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी कतारच्या अमीरशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. सोमवारी कतारमधील अमेरिकन एअरबेसवर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा केला. १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध लवकरच थांबेल असं ते म्हणाले. मात्र काही तासांतच इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला. युद्धविराम झाले नसल्याचे स्पष्ट केले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की इस्रायलसोबत युद्धविराम झालेला नाही. इस्रायली हल्ले थांबले तरच इराण आपली प्रतिक्रिया थांबवेल, असा इशारा त्यांनी दिला. यावर अद्याप अंतिम निर्णय व्हायचा आहे.
इस्रायलने सुरू केले युद्ध, हल्ले थांबवा, नाहीतर जोरदार हल्ले
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी X वर पोस्ट केलं, "इराणने नेहमीच स्पष्ट केल्याप्रमाणे, इस्रायलने युद्ध सुरू केले आहे, इराणने नाही. आतापर्यंत युद्धविराम किंवा लष्करी कारवाई थांबवण्याबाबत कोणताही "समझोता" झालेला नाही. इस्रायली प्रशासनाने तेहरान वेळेनुसार सकाळी ४ वाजेपूर्वी इराणी जनतेवरचे आपले बेकायदेशीर हल्ले थांबवावेत. त्यानंतर आमची कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही. आमच्या लष्करी कारवाईबाबतचा अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल."
अब्बास अराघची म्हणाले, "इस्रायलला त्यांच्या हल्ल्याची शिक्षा देण्यासाठी आमच्या शक्तिशाली सशस्त्र दलाची लष्करी कारवाई सकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. सर्व इराणी नागरिकांसह मी आमच्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानतो जे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या प्रिय देशाचे रक्षण करण्यास तयार आहेत. ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले."