
तेहरान : इराणने सोमवारी रात्रीच्या सुमारास अमेरिकेविरुद्ध थेट लष्करी हल्ला करत कतारमधील अल-उदीद अमेरिकन एअरबेसवर मिसाईल डागले. हा तोच बेस आहे जो अमेरिका पश्चिम आशियातील आपली सर्वात मोठी सामरिक मालमत्ता मानतो. हा एअरबेस मध्य पूर्वेतील अमेरिकन वर्चस्वाचे प्रतीक मानला जातो. आता इराणने त्याला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे इराणच्या पलटवारला अमेरिका कसे प्रत्युत्तर देतो हे बघण्यासारखे आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीचे बैठक बोलविली आहे. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
इराणने मिसाईल हल्ल्यानंतर निवेदन जारी केले आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने निवेदन जारी करत म्हटले, की ऑपरेशन बेशरत फतेह अंतर्गत पवित्र कोड आबा अब्दुल्ला अल-हुसेन (PBUH) सोबत, इराणी मिसाईलनी कतारच्या अल-उदीद बेसवर जोरदार हल्ला केला. हा बेस अमेरिकन वायुसेनेचे मुख्यालय आहे आणि संपूर्ण पश्चिम आशियातील सर्वात मोठा लष्करी तळ आहे.
इराणी सशस्त्र दलांनी इशारा देत म्हटले, की आम्ही आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध, प्रादेशिक अखंडतेविरुद्ध आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला सडेतोड देऊ. हा संदेश व्हाईट हाऊस आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आहे.
हा हल्ला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर झालेल्या लष्करी कारवाईच्या प्रतिउत्तरार्थ करण्यात आला आहे, ज्यामध्ये अमेरिकेने फोर्डो, नातंझ आणि इस्फहान येथील इराणच्या भूमिगत अणुस्थळांना बंकर-बस्टर बॉम्बने उद्ध्वस्त केले होते. ट्रम्पनी तेव्हा म्हटले होते की जर इराण शांतता नको असेल तर पुढील कारवाया आणखी तीव्र आणि घातक असतील.