
Iran Struggles to Clear Hormuz Strait : मध्य-पूर्वेतील संघर्षावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखण्यासाठी इराणनेच पेरलेले सागरी सुरुंग (वॉटर माईन्स) आता त्यांच्यासाठी संकट बनले आहेत. हे सुरुंग नेमके कुठे पेरले आहेत, हे शोधण्यात इराणलाच अपयश येत आहे. त्यामुळे जहाजांच्या वाहतुकीसाठी ही सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इराणच्या या गोंधळामुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने लवकरात लवकर होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करावी, असा दबाव इराणवर टाकला आहे. गेल्या महिन्यात इराणने लहान बोटींच्या मदतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी सुरुंग पेरले होते. पण, हे सुरुंग कुठे पेरले याची नेमकी माहिती आता इराणकडेच नाही. काही रिपोर्ट्सनुसार, यातील काही सुरुंग आपोआप आपली जागा बदलतील अशा पद्धतीने पेरण्यात आले होते. आता हीच गोष्ट इराणसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. हे सुरुंग शोधणे एक मोठे आव्हान बनले असून, यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना धोका निर्माण झाला आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला संमती दिली होती आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचे मान्य केले होते. मात्र, 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, या सागरी सुरुंगांमुळे शनिवारपर्यंत इराणला ही सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी खुली करता आलेली नाही. त्यामुळे इराणने जहाजांच्या वाहतुकीसाठी एक वेगळा मार्ग सुचवला आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी तब्बल २५% तेल याच मार्गावरून वाहून नेले जाते.
वॉशिंग्टन: मध्य-पूर्वेतील संकट कमी करण्यासाठी इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. 'आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी साफ करण्याचे काम सुरू केले आहे. युद्धानंतर अमेरिकेची दोन लढाऊ जहाजे होर्मुझ ओलांडून गेली आहेत. या जहाजांवरील तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याखालचे बॉम्ब हटवण्यास सुरुवात केली आहे,' असे ट्रम्प म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'रिकामे ऑइल टँकर्स तेल भरण्यासाठी अमेरिकेकडे येत आहेत. आमच्याकडे सौदी अरेबियापेक्षाही जास्त तेलसाठा आहे. जगातील सर्वात मोठे तेल टँकरसुद्धा सर्वोत्तम तेल भरण्यासाठी अमेरिकेत येत आहेत. जगाला कुठेही तेल निर्यात करण्याची अमेरिकेची तयारी आहे, इतके तेल आमच्याकडे आहे.' याशिवाय, त्यांनी इतर देशांना टोलाही लगावला. 'आम्ही आता चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक देशांच्या सोयीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी साफ करत आहोत. आश्चर्य म्हणजे, या देशांना स्वतःहून हे काम करण्याची हिंमत किंवा इच्छाशक्ती नाही,' असे ते म्हणाले.
२०,००० टन एलपीजी घेऊन भारताचं 'जग विक्रम' जहाज होर्मुझमधून सुखरूप बाहेर
नवी दिल्ली: युद्धविराम असूनही होर्मुझमधील तणाव कायम असताना, भारताचे 'जग विक्रम' नावाचे एलपीजी जहाज सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने निघाले आहे. मुंबईस्थित 'ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी'च्या मालकीच्या या जहाजाची क्षमता २६,००० टनांपेक्षा जास्त आहे. सध्या हे जहाज २०,००० टन एलपीजी घेऊन प्रवास करत आहे. युद्धानंतर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारे हे ९ वे जहाज ठरले आहे. अजूनही १५ जहाजे तिथेच अडकून पडली आहेत.