
Iran Loses Track of Its Own Sea Mines : जगातल्या सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे सध्या संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. या मार्गावरून जगातला जवळपास २०-२५% तेलाचा पुरवठा होतो, पण आता हा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. यामागचं कारण खूपच धक्कादायक आहे. एका रिपोर्टनुसार, इराणने स्वतःच पेरलेल्या सागरी सुरुंगांची (Sea Mines) जागा आता त्यांना सापडत नाहीये. त्यामुळे हा महत्त्वाचा सागरी मार्ग कधी सुरू होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार, युद्धाच्या काळात इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अनेक ठिकाणी सागरी सुरुंग पेरले होते. शत्रू देशांची जहाजे रोखण्यासाठी ही रणनीती होती. पण आता परिस्थिती थोडी शांत झाली आहे आणि जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. अशात इराणसमोर एक नवी अडचण उभी राहिली आहे. असं म्हटलं जातंय की, या सुरुंगांच्या नेमक्या जागेची माहिती (Location Data) आता उपलब्ध नाही. त्यामुळे ते सुरुंग काढून टाकणं खूप अवघड झालं आहे. याच कारणामुळे इराण हा सागरी मार्ग पूर्णपणे सुरक्षित घोषित करू शकत नाहीये.
हा एक अरुंद सागरी मार्ग आखाती देशांना उर्वरित जगाशी जोडतो. येथून दररोज लाखो बॅरल कच्चं तेल आणि गॅस जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवला जातो. जर हा मार्ग बंद राहिला, तर जागतिक तेल पुरवठ्यावर थेट परिणाम होतो. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात आणि मोठं आर्थिक संकट उभं राहू शकतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की, हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे. त्यांच्या मते, जर हा मार्ग बंद राहिला, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होईल. या मार्गाच्या बंद होण्याने तेल आणि गॅसचा पुरवठा थांबला आहे, ज्यामुळे अनेक देशांमध्ये किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अमेरिका सतत इराणवर हा मार्ग खुला करण्यासाठी दबाव टाकत आहे.
इराण आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी एक नवी व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये जहाजांसाठी एक प्रकारची “क्लिअरन्स सिस्टीम” तयार केली आहे, जिथे जहाजांना आधी परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, इराण ओमानसोबत मिळून एक नवीन सागरी प्रोटोकॉल तयार करत आहे, जेणेकरून जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे होऊ शकेल. पण जोपर्यंत सुरुंगांचा धोका पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था पूर्ण क्षमतेने लागू होणं कठीण आहे.
इराणने जहाजांसाठी काही विशेष मार्गही निश्चित केले आहेत, जेणेकरून ती सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. या मार्गांवर नौदलाची नजरही असणार आहे. जहाजांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी ठरवलेल्या मार्गांचाच वापर करावा आणि इराणी नौदलाच्या सूचनांचं पालन करावं. यामुळे अपघात आणि हल्ल्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की, अमेरिका लवकरच हा मार्ग खुला करण्यात यशस्वी होईल आणि इतर देशही यात मदत करू शकतात. पण जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. जोपर्यंत इराण स्वतः पेरलेले सुरुंग पूर्णपणे काढून टाकत नाही, तोपर्यंत हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित मानला जाऊ शकत नाही. सध्या हॉर्मुझची सामुद्रधुनी फक्त एक सागरी मार्ग नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनरेखा बनली आहे. इराणसमोरील तांत्रिक आणि सामरिक आव्हानं हे संकट आणखी गुंतागुंतीचं बनवत आहेत.