
Artemis 2 Crew Makes Historic Splashdown : आर्टेमिस 2 मोहिमेने इतिहास रचला आहे. चंद्राला प्रदक्षिणा घालून अंतराळवीरांना घेऊन निघालेलं ओरिऑन यान पृथ्वीवर सुखरूप परतलं आहे. भारतीय वेळेनुसार, पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी या यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर ५ वाजून ३७ मिनिटांनी सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात त्याचं यशस्वी स्प्लॅशडाऊन झालं. तब्बल ५४ वर्षांनंतर मानवाने चंद्राची दुसरी बाजू पाहिली आहे, जी पृथ्वीवरून कधीच दिसत नाही.
या मोहिमेने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आर्टेमिस 2 मोहिमेतील चार अंतराळवीर आता पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करणारे मानव ठरले आहेत. यापूर्वी १९७० मध्ये अपोलो १३ मोहिमेतील अंतराळवीरांनी ४,००,१७१ किलोमीटर दूर प्रवास करून विक्रम केला होता. हा विक्रम काल रात्री ११ वाजून २६ मिनिटांनी मोडला गेला. आज पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी ओरिऑन यान पृथ्वीपासून तब्बल ४,०६,७७१ किलोमीटर अंतरावर पोहोचलं होतं. आता हाच मानवाचा पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवासाचा नवीन विक्रम आहे.
१९७२ च्या अपोलो १७ मिशननंतर पहिल्यांदाच माणसांना घेऊन एखादं यान चंद्राच्या कक्षेत गेलं आहे. अपोलो १७ मधील अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, तर आर्टेमिस २ मधील अंतराळवीरांनी १० दिवस चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर पुनरागमन केलं आहे. याआधी २०२२ मध्ये झालेली आर्टेमिस १ ही मानवरहित मोहीम यशस्वी ठरली होती. चीनच्या आधी चंद्रावर पुन्हा एकदा मानव उतरवणे हे अमेरिकेचं मुख्य ध्येय आहे. नव्या योजनेनुसार, आर्टेमिस ४ मोहिमेत चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवलं जाईल.