होर्मुझमध्ये इराणचा क्षेपणस्र हल्ला; UAE च्या जहाजावरील भारतीय खलाशाचा मृत्यू

Published : Jul 14, 2026, 08:12 AM IST
US Counters Irans Claim of Controlling Strait of Hormuz Amid Rising Tensions

सार

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन इराण आणि अमेरिकेमधील तणाव अधिक वाढला गेला आहे. होर्मुझमधील इराणच्या हल्ल्यात युएईच्या जहाजावरील एका खलाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशातच होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय आठजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

UAE च्या दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य

UAE संरक्षण मंत्रालयाने हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी म्हटले की, 'मोम्बासा' आणि 'अल बहियाह' या राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडील भागात हल्ला करण्यात आला. ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी या जहाजांना लक्ष्य केले. क्षेपणास्त्रांचा मारा होताच दोन्ही जहाजांमध्ये आग लागून मोठे नुकसान झाले.

भारतीय खलाशाचा मृत्यू, सहा भारतीय जखमी

या हल्ल्यात 'मोम्बासा' जहाजावरील एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृत भारतीय खलाशाची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

UAE ची कठोर भूमिका

या हल्ल्यानंतर युएईने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व आणि सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असा इशाराही युएईकडून देण्यात आला आहे.

 इराणवर अमेरिकेचे हल्ले तीव्र

दुसरीकडे, अमेरिकेनेही इराणविरोधातील लष्करी कारवाया वाढवल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल कमांडने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबत बंदर अब्बास, किश, केश्म आणि अबू मूसा बेटांवर स्फोट झाल्याच्या बातम्या इराणी माध्यमांनी दिल्या आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रणासाठी संघर्ष

जगातील तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी सध्या इराण-अमेरिका संघर्षाचे केंद्र बनली आहे. अमेरिकेने इराणी बंदरांकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या जहाजांवर पुन्हा नौदल नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Vladimir Putin : मोदींच्या वैयक्तिक लक्षामुळेच व्यापार वाढला, पुतिन यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
Hormuz Strait : हॉर्मुझ सामुद्रधुनी आमचीच! ट्रम्प यांच्या दाव्यामुळे अमेरिकेचा खरा चेहरा समोर