पीओकेत मोठा हिंसाचार, काश्मिरी जनता रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना पळता भूई थोडी

पाकव्याप्ती काश्मीरमध्ये काश्मिरी जनता पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.

Rameshwar Gavhane | Published : May 12, 2024 11:33 AM IST

पाकव्याप्ती काश्मीरमध्ये काश्मिरी जनता पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे. भारतीय काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे झुकली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या इतक्या वर्षांच्या फसवणुकीविरोधात एल्गार पुकारला आहे. जनता रस्त्यावर आल्याने पाकिस्तान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. वीज संकट, महागाई आणि कराचा मोठा बोझ्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला. राजधानी मुझफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अनेक भागात त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना पिटाळून लावण्यात आले. त्यांना पळता भूई थोडी झाली आहे. अटकाव करणाऱ्या पोलिसांवर जनतेचा राग निघाला. याविषयीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात लोक पोलिसांच्या काठ्या हिसकावून त्यांनाच फटकावत असल्याचे दिसत आहे. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पण देण्यात आल्या. वाढीव कुमक आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली आहे.

पाकव्याप्ती काश्मीरात अनेक ठिकाणी प्रदर्शन

राजधानी मुझफ्फराबादमध्ये पाकव्याप्त दादियाल, मीरपूर, समाहनी, सेहंसा, रावलकोट, खुइरट्टा, तत्तापानी आणि हट्टियन बाला या भागात आंदोलकांनी जोरदार प्रदर्शन केले आहे. इतकेच नाही तर या सर्व ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. जनतेच्या रेट्यापुढे पोलिसांना पळ काढावा लागला.

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग

पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा परिणाम पीओकेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर संयुक्त जनता समितीने (JKJAAC) मुझफ्फराबादमध्ये बंदचे आयोजन केले होते. जनता रस्त्यावर येताच त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. उग्र प्रदर्शन सुरु झाल्यावर पोलिसांनी अश्रुधुराच गोळे सोडले आणि हवेत फायरिंग केले. पोलिसांनी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडले. मंगला धरणाची वीज मोफत मिळावी आणि पिठावरील कर माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

 

Share this article