
मुंबई : इराणच्या नवी दिल्लीतील दूतावासाने मंगळवारी भारत सरकार, भारतीय नौदल आणि हवाई दलाचे विशेष आभार मानले. अरबी समुद्रात चाच्यांनी 'अझिनी' या मासेमारी करणाऱ्या जहाजाचं अपहरण केलं होतं. या जहाजावरील २० इराणी खलाशांची भारतीय जवानांनी सुखरूप सुटका केली. भारताने आपल्या सीमेबाहेर जाऊन दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परतेचं इराणने कौतुक केलं आहे.
इराणच्या दूतावासाने 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, "अझिनी जहाजावरील २० इराणी खलाशांची चाच्यांकडून सुटका केल्याबद्दल आम्ही भारत सरकार, नौदल आणि हवाई दलाचे मनापासून आभारी आहोत. भारतीय जवानांनी दाखवलेलं धाडस, व्यावसायिकता आणि उत्तम समन्वय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. यातून भारताची आपत्ती व्यवस्थापन आणि सीमेबाहेर जाऊन जीव वाचवण्याची बांधिलकी दिसून येते."
या कारवाईमुळे भारत आणि इराणमधील जुने संबंध अधिक घट्ट झाल्याचंही दूतावासाने म्हटलं आहे. "इराण आणि भारत यांच्यातील मैत्री, एकता आणि सहकार्याची भावना यातून दिसून येते. इराणी खलाशांना सुखरूप वाचवणाऱ्या सर्व जवानांचे आम्ही आभारी आहोत," असंही या पोस्टमध्ये नमूद केलंय.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. मुंबईपासून ३,००० किलोमीटर दूर अरबी समुद्रात तब्बल ४८ तास हे ऑपरेशन चाललं. २ नोव्हेंबर रोजी नौदलाने या जहाजाचा शोध घेतला आणि सशस्त्र चाच्यांच्या तावडीतून सर्व २० खलाशांची सुखरूप सुटका केली.
या यशस्वी कारवाईबद्दल राजनाथ सिंह यांनी नौदलाचं अभिनंदन केलं. त्यांनी 'X' वर लिहिलं, "२ नोव्हेंबर रोजी मुंबईपासून ३००० किमी दूर अरबी समुद्रात ४८ तासांचं अचूक ऑपरेशन राबवून अझिनी जहाजावरील २० खलाशांची सुटका केल्याबद्दल भारतीय नौदलाचं अभिनंदन."
"हवाई दलाच्या मदतीने नौदलाने अत्यंत वेगाने जहाजाचा शोध घेतला आणि सशस्त्र चाच्यांकडून खलाशांची सुटका केली. यातून भारतीय नौदलाची सज्जता आणि सागरी धोक्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध होते," असंही ते म्हणाले.
या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांचं कौतुक करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "आपल्या शूर जवानांनी पुन्हा एकदा भारताची क्षमता आणि सागरी सुरक्षा राखण्याचा संकल्प सिद्ध केला आहे." हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.