Disney Layoffs : डिझ्नीमध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर गदा

Published : Nov 03, 2026, 10:31 AM IST
Disney Layoffs : डिझ्नीमध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर गदा

सार

खर्चात २० टक्के कपात करण्यासाठी डिस्ने कंपनीने आपल्या मॅनेजर्सना नवीन मार्ग शोधण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'वॉल्ट डिस्ने' (Walt Disney Co.) आपला खर्च कमी करण्यासाठी पुन्हा एकदा नोकरकपातीच्या तयारीत आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या कपातीमुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जोश डी'अमारो यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत मोठे बदल होत आहेत. याचाच एक भाग म्हणून, वार्षिक खर्चात सुमारे २० टक्के कपात कशी करता येईल, याचे मार्ग शोधण्याचे आदेश काही मॅनेजर्सना देण्यात आले आहेत.

सध्या डिस्नेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वाढता वापर, बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची संथ कमाई, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समधील वाढती स्पर्धा आणि थीम पार्क्समध्ये परदेशी पर्यटकांची घटलेली संख्या, यांसारख्या कारणांमुळे कंपनीला हा खर्च कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या बदलांचा परिणाम प्रत्येक बिझनेस युनिटवर वेगवेगळ्या प्रकारे होईल. काही विभागांमध्ये कपातीचे प्रमाण जास्त असू शकते. या कपातीतून वाचलेला पैसा चित्रपट आणि टेलिव्हिजन प्रोग्रामिंग, तंत्रज्ञान, थीम पार्क्स आणि क्रूझ शिप व्यवसायासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पुन्हा गुंतवला जाईल, असे डिस्नेने स्पष्ट केले आहे.

या नव्या फेरीत नेमक्या किती नोकऱ्या जातील, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिस्नेकडे २ लाख ३१ हजारांहून अधिक कर्मचारी होते. आपला नफा वाढवण्यासाठी आणि व्यवसायाची घडी नीट बसवण्यासाठी डिस्नेने याआधीही अनेकदा नोकरकपात केली आहे.

रॉयटर्सने सप्टेंबरमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या एचआर (HR) आणि तंत्रज्ञान विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. याशिवाय, २०२५ मध्ये शेकडो पदे कमी करण्यासोबतच एप्रिलमध्येही सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता.यापूर्वी २०२३ मध्ये माजी सीईओ बॉब इगर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ५.५ अब्ज डॉलर्सची बचत करण्यासाठी तब्बल ७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

मनोरंजन क्षेत्रात नोकरकपात करणारी डिस्ने ही एकमेव कंपनी नाही. आपला खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नेटफ्लिक्स (Netflix) आणि या वर्षाच्या सुरुवातीला वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीला (Warner Bros. Discovery) टेकओव्हर करणाऱ्या स्कायडान्स (Skydance) यांसारख्या बड्या मीडिया कंपन्यांनीही नोकरकपातीचा मार्ग अवलंबला आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Europe Supermarket Hacking : युरोपमधील सुपरमार्केटचे फ्रीज कोण हॅक करतंय?
Indian Navy Rescue : भारतीय नौदलाची कमाल! २० नागरिकांची केली सुटका, इराणने मानले आभार