Houthi Attack : आखाती युद्धात हुथींची एन्ट्री, इस्रायलवर हल्ला; दोन महत्त्वाच्या सागरी मार्गांवर संकट!

Published : Mar 29, 2026, 08:49 AM IST
Houthi Rebels Attack Israel

सार

Houthi Rebels Attack Israel : इराण-इस्रायल संघर्षात आता येमेनच्या हुथी बंडखोरांनीही उडी घेतली असून, त्यांनी थेट इस्रायलवर हल्ला केला आहे. 

Houthi Rebels Attack Israel : लेबनॉनच्या हिजबुल्लाहनंतर आता येमेनच्या हुथी बंडखोरांनीही इराण-इस्रायल संघर्षात उडी घेतली आहे. इराणला पाठिंबा देत त्यांनी थेट इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात हुथींनी हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्थात, ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.

तरीही, हुथींच्या या एन्ट्रीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीप्रमाणेच आता तांबड्या समुद्रातील व्यापारी जहाजांची वाहतूक विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण तांबड्या समुद्रात बाब-अल-मांडेब ही सामुद्रधुनी आणि सुएझ कालवा हे दोन अत्यंत महत्त्वाचे जलमार्ग आहेत. हुथींचे मुख्य कार्यक्षेत्र तांबडा समुद्रच असल्याने, इथे संघर्ष पेटल्यास हे दोन्ही मार्ग बंद होऊ शकतात. असं झाल्यास फक्त तेलच नाही, तर संपूर्ण जगाच्या व्यापारी मालवाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

तांबडा समुद्र इतका महत्त्वाचा का?

इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायल-हमास युद्धादरम्यान तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सातत्याने लक्ष्य केले होते. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ पर्यंत हुथींनी १०० पेक्षा जास्त व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून २ जहाजे उद्ध्वस्त केली होती. मात्र गेल्या काही काळापासून ते शांत होते.

इराणसोबतच्या ताज्या संघर्षापूर्वी, दरवर्षी सुमारे १ लाख कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची वाहतूक तांबड्या समुद्रातून होत असे. या मार्गावरील कोणताही हल्ला थेट सुएझ कालवा आणि बाब-अल-मांडेब सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम करतो.

भूमध्य समुद्राकडे तेल, गॅस आणि इतर माल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी हा एक निर्णायक जलमार्ग आहे. दरवर्षी जागतिक सागरी व्यापारापैकी सुमारे १०% व्यापार (ज्यात कंटेनर जहाजांच्या वाहतुकीचा ४०% वाटा आहे) याच कालव्यातून होतो.

जर हुथींचे हल्ले टाळण्यासाठी मालवाहू जहाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या 'केप ऑफ गुड होप' मार्गाने वळसा घातला, तर त्यांना ६,५०० किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागेल. यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल, खर्च वाढेल, उत्पादनांच्या किमती वाढतील आणि पुरवठा साखळी विस्कळीत होईल. याचा थेट परिणाम जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या, गॅसच्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होईल.

हुथींचा पहिला थेट हल्ला

शुक्रवारीच हुथी बंडखोरांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरी यांनी इस्रायलवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच हा हल्ला करण्यात आला. "दक्षिण इस्रायलमधील संवेदनशील लष्करी तळांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे," असे सरी यांनी म्हटले आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!