
वॉशिंग्टन: इराणविरोधातील लष्करी कारवाई महिनोनमहिने चालणार नाही, तर काही आठवड्यांतच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी फ्रान्समध्ये झालेल्या G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'आमची लष्करी कारवाई ठरलेल्या वेळेनुसार किंवा त्यापेक्षाही वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे काही महिन्यांत नाही, तर काही आठवड्यांतच आम्ही आमचं लक्ष्य गाठू,' असं रुबिओ यांनी स्पष्ट केलं.
रुबिओ यांनी पुढे सांगितलं की, 'आम्हाला जमिनीवर सैन्य (ground troops) उतरवण्याची गरज पडणार नाही, अशी आशा आहे. पण परिस्थिती बदलल्यास राष्ट्राध्यक्षांना योग्य निर्णय घेता यावा, यासाठी काही सैन्य तुकड्या त्या भागात तैनात केल्या जात आहेत.' अमेरिकेने सध्या हजारो मरिन्सच्या दोन तुकड्या मध्य पूर्वेकडे पाठवल्या आहेत. यातील पहिली तुकडी मार्च महिन्याच्या अखेरीस तिथे पोहोचेल. याशिवाय, पेंटागॉन हजारो एअरबॉर्न सैनिकही तैनात करण्याची शक्यता आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेत्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या केल्यानंतर हे युद्ध सुरू झालं. आता अमेरिकेच्या या मोठ्या सैन्य तैनातीमुळे हे युद्ध जमिनीवर दीर्घकाळ चालेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांमधील नागरिक व जहाजांवर प्रतिहल्ले केले. याचा परिणाम जागतिक ऊर्जा आणि मालवाहतूक व्यापारावर झाला असून, महागाई आणि आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध संपवायचं आहे. ते सतत मुत्सद्दी मार्गाने तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं सांगत आहेत, पण इराणने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. इराणने रोखून धरलेली होरमुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेली मुदत ट्रम्प यांनी आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. युद्ध संपल्यानंतरही इराण होरमुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कर (toll) लावण्याची शक्यता आहे. यावर रुबिओ यांनी G7 परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. 'या जलमार्गाचा फायदा युरोपीय आणि आशियाई देशांना जास्त होतो, त्यामुळे त्यांनीही सुरक्षेची जबाबदारी उचलावी. या व्यापारी मार्गावर अमेरिकेचं अवलंबित्व कमी आहे,' असंही रुबिओ म्हणाले.