
PM Modi Discusses West Asia Crisis with Saudi Crown Prince Condemns Energy Hub Attacks: नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या दोन नेत्यांनी प्रदेशातील शांततेसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटावर सविस्तर चर्चा केली. पश्चिम आशियातील ऊर्जा प्रकल्पांवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो, असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
या संभाषणाची माहिती स्वतः पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान एचआरएच प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी बोलणं झालं. आम्ही पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षावर चर्चा केली. या भागातील ऊर्जा केंद्रांवर आणि संबंधित ठिकाणांवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारत निषेध करतो, हे मी त्यांना सांगितलं," असं मोदींनी नमूद केलं.
युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सागरी व्यापारी मार्ग खुले ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इंधन आयातीवर परिणाम करणारे अडथळे टाळण्यासाठी एकत्र मिळून काम करण्यावरही या चर्चेत सहमती झाली. या प्रदेशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं.