
मुंबई : पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणं, विशेषतः मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कुत्र्यांसोबत दुसऱ्या शहरात शिफ्ट होणं मालकांसाठी खूपच कठीण असतं. पण, इथन गासकिल (Ethan Gaskill) याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात कुत्र्यांना विमानात चक्क फर्स्ट क्लास प्रवाशांसारखी वागणूक दिली जात आहे. या व्हिडिओत त्याचा ब्लोंडी (Blondie) नावाचा कुत्रा 'बार्क एअर' (BARK Air) मधून प्रवास करताना दिसतोय. ही एअरलाईन खास कुत्री आणि त्यांच्या मालकांसाठी डिझाईन केलेली उड्डाणे देते. पप्पी कॅपुचिनो, रिलॅक्सिंग मसाज ते अगदी मोकळेपणाने खेळण्यासाठी जागा, असा हा प्रवास सर्वांसाठीच एक भारी अनुभव ठरला.
इथनने व्हिडिओत सांगितलं की, तो लॉस एंजेलिसवरून न्यूयॉर्कला शिफ्ट होत होता. मोठ्या कुत्र्यांना नेण्यासाठी जास्त पर्याय नसल्याने त्याने 'बार्क एअर'ची निवड केली. अशा विमानांचं तिकीट खूप महाग असल्याने ही सेवा आपण पहिल्यांदा आणि कदाचित शेवटचीच वापरत असल्याचंही तो म्हणाला.
त्यांचा हा प्रवास सकाळी ८ च्या सुमारास लॉस एंजेलिसच्या व्हॅन न्युज विमानतळावरून (Van Nuys Airport) सुरू झाला. LAX (लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ) सारख्या मोठ्या व्यावसायिक विमानतळांऐवजी, या एअरलाईनचे स्वतंत्र टर्मिनल आहे. सर्व प्रवाशांना एक तास आधीच बोलावण्यात आलं होतं, जेणेकरून फ्लाइटमध्ये बसण्यापूर्वी कुत्र्यांची एकमेकांशी चांगली ओळख होईल.
एअरलाईनच्या टीमनेही कुत्र्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं आणि त्यांना एकमेकांसोबत कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली.
इथनने बार्क एअर निवडण्यापूर्वी K9 आणि JSX सारख्या इतर पर्यायांचाही विचार केला होता. पण, बार्क एअरच्या टीमचं कुत्र्यांवर असलेलं प्रेम पाहून त्याने त्यांचं भरभरून कौतुक केलं.
हे डायरेक्ट फ्लाइट सुमारे चार तासांचं होतं, पण या वेळात कुत्र्यांना अजिबात कंटाळा येऊ दिला नाही. त्यांना सुरुवातीला पप्पी कॅपुचिनो देण्यात आलं. त्यानंतर शॅम्पेनसारखं दिसणारं एक ड्रिंक दिलं गेलं, जे खरंतर बोन ब्रोथ आणि पाण्याचे मिश्रण होतं.
विमानात कुत्र्यांना पट्टा लावून फिरण्याची मुभा होती. यामुळे प्रवासात त्यांना एकमेकांसोबत खेळण्याची आणि मोकळेपणाने फिरण्याची संधी मिळाली.
प्रवासाच्या शेवटी जेव्हा क्रू मेंबर्सनी कुत्र्यांसाठी स्पा कार्ट आणली, तो क्षण खूपच भारी होता. त्यांना स्कॅल्प मसाज, गळ्यात बांधायला बँडाना आणि खास परफ्युम मारण्यात आलं. उड्डाणादरम्यान कुत्र्यांची त्वचा कोरडी पडू नये म्हणून त्यांच्या नाकावर आणि पंज्यांना एक खास हायड्रेटिंग बामही लावण्यात आला.
पण इथनचा सर्वात आवडता क्षण तो होता जेव्हा क्रूने ब्लोंडीच्या डोक्यावर कॅप्टनची टोपी घालून त्याचा फोटो काढला. हा फोटो या प्रवासाची एक खास आठवण म्हणून राहील, असं इथन म्हणाला. कारण पुन्हा कधी असा प्रवास करण्याची संधी मिळेल की नाही, हे त्याला माहीत नव्हतं.
लँडिंगनंतर इथन आणि त्याचे मित्र कारने न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या नवीन घरी पोहोचले.
या व्हिडिओला सोशल मीडियावर युजर्सकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी ब्लोंडीबद्दल प्रेम व्यक्त केलं आणि या अनोख्या प्रवासाच्या अनुभवाचं कौतुक केलं.
एका युजरने कमेंट केली: "इथन, हे पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. आय लव्ह ब्लोंडी!"
दुसऱ्या एका युजरने लिहिलं: "या व्हिडिओने माझा दिवस बनवला."
तिसऱ्या युजरने म्हटलंय: "तू सर्वोत्तम डॉग डॅड आहेस. तुम्ही सगळे सुखरूप घरी पोहोचलात, याचा आनंद आहे!"
एप्रिल २०२५ मध्ये विमान सेवा सुरू करण्यापूर्वी, BARK कंपनी मुख्यत्वे कुत्र्यांचं अन्न, खेळणी आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी ओळखली जायची. आता त्यांनी बार्क एअरच्या माध्यमातून हवाई प्रवासातही पाऊल टाकलं आहे, ज्याचा उद्देश कुत्री आणि त्यांच्या मालकांचा प्रवास सुखकर बनवणं हा आहे.
ही एअरलाईन न्यूयॉर्क, लिस्बन, लॉस एंजेलिस, लंडन, माद्रिद, पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या शहरांना जोडणारी फ्लाइट्स चालवते.
प्रवासादरम्यान कुत्र्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बार्क एअर विशेष व्यवस्था करते. विमानात चढण्यापूर्वी बाहेर टॉयलेटची सोय असते, तर उड्डाणादरम्यान कुत्र्यांना नैसर्गिक विधींसाठी विमानात विशेष पॅड्स असलेली जागाही उपलब्ध करून दिली जाते. या सर्व सुविधा, खाण्यापिण्याची सोय आणि वैयक्तिक लक्ष यामुळे पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांसाठी हवाई प्रवास खूपच सोयीचा होतो.