
मुंबई : सौदी अरेबियातील सद्यस्थिती आणि सुरक्षेचा विचार करता, इंडिगो एअरलाईन्सने सौदीतील चार प्रमुख शहरांची उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये जेद्दाह, मदिना, रियाध आणि दम्माम या शहरांचा समावेश असून, ३० नोव्हेंबरपर्यंत ही सर्व उड्डाणे बंद राहतील, असे इंडिगोने एका ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये स्पष्ट केले आहे.
तिकीट बुकिंग करताना दिलेल्या संपर्क माहितीवरून प्रवाशांना या बदलाची माहिती दिली जात आहे, असे कंपनीने सांगितले. इंडिगोने एक्स (X) वर पोस्ट करत म्हटले आहे की, "सौदी अरेबियातील सद्यस्थिती पाहता, जेद्दाह, मदिना, रियाध आणि दम्माम येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. बाधित ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत संपर्काद्वारे माहिती दिली जात आहे."
ट्रॅव्हल ॲडव्हायझरी: सौदी अरेबियातील सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन, ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जेद्दाह, मदिना, रियाध आणि दम्मामची उड्डाणे रद्द केली आहेत. बुकिंगच्या वेळी दिलेल्या संपर्क माहितीवर ग्राहकांना याची कल्पना दिली जात आहे. या काळात ग्राहकांना आवश्यक ती मदत आणि अपडेट्स देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत. आमच्या ग्राहकांची आणि क्रू सदस्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. — इंडिगो (@IndiGo6E) नोव्हेंबर १८, २०२६. इंडिगोने पुढे स्पष्ट केले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दुसरीकडे, अल जझीराच्या वृत्तानुसार, हौथी बंडखोरांनी सौदीच्या दक्षिण भागाकडे डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने केला आहे. युतीच्या प्रवक्त्याने एक्स (X) वर दिलेल्या माहितीत अधिक तपशील दिलेला नाही. सौदी प्रशासनाने देशाच्या नैऋत्य भागातील आभा शहर आणि खमिस मुशायत प्रांतासाठी काही काळ धोक्याचा इशारा (अलर्ट) जारी केला होता. मात्र, धोका टळल्यानंतर सौदी नागरी संरक्षणाने (सिव्हिल डिफेन्स) हा इशारा मागे घेतला.
दरम्यान, हौथी लष्कराचे प्रवक्ते सारी यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी जिझान प्रदेशातील एका लक्ष्यावर अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तसेच खमिस मुशायत हवाई तळावरील ड्रोन हल्ला 'अचूक' लागल्याचा दावाही त्यांनी केला, असे अल जझीराने वृत्त दिले आहे. यापूर्वी सारी यांनी किंग खालिद विमानतळ आणि रियाध आर्थिक केंद्राला लक्ष्य केल्याचे म्हटले होते. मात्र, हौथी लष्कराच्या या दाव्यांवर सौदी प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सर्व घडामोडींमुळे सौदी अरेबियात सुरक्षेची चिंता वाढली असून, त्यामुळेच इंडिगोने या चार शहरांमधील उड्डाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.