Donald Trump : 'मी अमेरिकेच्या वतीने बोलू शकत नाही', पुतिन यांच्या मैत्रीवरील प्रश्नावर ट्रम्प यांचे गोलगोल उत्तर

Published : Nov 21, 2026, 08:35 AM IST
US President Donald Trump and Russian Leader Vladimir Putin

सार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अमेरिकेचे मित्र आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर 'मी अमेरिकेच्या वतीने बोलू शकत नाही' असे उत्तर दिल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी टीका होत आहे.

मुंबई : अमेरिका (USA) चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल विचारले असता ते थोडे गडबडलेले दिसले.

चीनमधील शेन्झेन येथे गुरुवारी, १९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय चर्चा केली होती. पुतिन यांच्यासोबतच्या या भेटीत ट्रम्प यांनी त्यांना आपला ‘मित्र’ म्हटले होते.

मात्र, फिलिपिन्स आणि चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या शुक्रवारीच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुतिन यांच्याबाबत वापरलेल्या या मैत्रीपूर्ण शब्दांवरून पत्रकारांनी त्यांना कोंडीत पकडले. या वैयक्तिक संबंधांचा अमेरिकेसाठी नेमका अर्थ काय, असा सवाल त्यांना विचारण्यात आला.

‘मी अमेरिकेच्या वतीने बोलू शकत नाही’

व्हाईट हाऊसच्या या पत्रकार परिषदेत सीएनएनच्या प्रतिनिधी कैटलान कॉलिन्स यांनी ट्रम्प यांना विचारले की, रशियाची इराणसोबत घनिष्ठ मैत्री असताना, पुतिन यांना अमेरिकेचे मित्र मानता येईल का?

या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे टाळत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की ते अमेरिकेसाठी बोलू शकत नाहीत. त्यानंतर त्यांनी विषय बदलून पुतिन यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांवर बोलायला सुरुवात केली. सोबतच रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपांना त्यांनी पुन्हा एकदा डेमोक्रॅटिक पक्षाने रचलेला 'बोगस बनाव' म्हटले.

“मी अमेरिकेच्या वतीने बोलू शकत नाही,” ट्रम्प म्हणाले.

“रशियाच्या या बोगस हस्तक्षेपाच्या प्रकरणात मी पुतिन यांच्या संपर्कात होतो आणि खरे सांगायचे तर ते खूप चांगले वागले. तो एक रचलेला खोटा बनाव होता. डेमोक्रॅट्सनी तयार केलेला तो एक बोगस आरोप होता, आणि कदाचित त्यामुळेच मला निवडणूक जिंकण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी मदत झाली,” असेही ते पुढे म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाच्या आरोपांकडे होता. तसेच या निवडणुकीतील ट्रम्प यांची मोहीम आणि रशिया यांच्यातील कथित संबंधांच्या फेडरल तपासावर ते बोलत होते.

स्पेशल काउंन्सेल रॉबर्ट म्युलर यांच्या नेतृत्वाखालील या तपासात रशियन हस्तक्षेप आणि ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेशी असलेल्या संभाव्य समन्वयाची चौकशी करण्यात आली होती.

वैयक्तिक संबंध, अण्वस्त्रे आणि युक्रेनबाबत भाष्य

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांवर पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे संबंध 'खूप चांगले' असल्याचे म्हटले. रशियाकडे असलेल्या मोठ्या अण्वस्त्र साठ्याकडे त्यांनी ताकदीचे प्रतीक म्हणून पाहिले. तसेच, एका दिवसात संपेल असे वाटणारे युद्ध ५ वर्षे लांबल्याने पुतिन यांना सध्या कठीण काळ जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत असे मला वाटते. आणि ते खरोखरच चांगले आहेत. त्यांच्याकडे खूप अण्वस्त्रे आहेत; अण्वस्त्रांच्या बाबतीत ते आपल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटते यामुळे आपल्याला अधिक ताकद मिळते,” असे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

“सध्या त्यांचा कठीण काळ सुरू आहे कारण जे युद्ध एका दिवसात संपायला हवे होते ते पाच वर्षे लांबले आहे.

“तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या प्रमुखांसोबत संबंध असलेला नेता मिळाला आहे,” अशी पुस्ती त्यांनी जोडली.

इराण आणि युक्रेनशी संबंधित सुरू असलेल्या युद्धांमुळे अमेरिका आणि रशियाचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. अशा वेळी शेन्झेनमध्ये चीनच्या शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या त्रिपक्षीय चर्चेबरोबरच पुतिन यांच्याबद्दल ट्रम्प यांनी वापरलेल्या मैत्रीपूर्ण शब्दांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

‘तेच तर त्यांचं काम आहे': ट्रम्प यांच्या विधानावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

पुतिन यांच्याशी असलेल्या मैत्रीवर बोलताना आपण अमेरिकेच्या वतीने बोलू शकत नाही, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर सोशल मीडिया, विशेषत: एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर मोठी टीका होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या या उत्तरावर अनेक युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशाच्या वतीने बोलणे ही राष्ट्राध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे अनेक युजर्सनी एक्सवर म्हटले आहे. तर काहींनी अमेरिकेच्या हिताच्या प्रश्नाला बगल देत पुतिन यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांना महत्त्व दिल्याने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.

युजर्सच्या एका मोठ्या वर्गाने ट्रम्प यांच्या या विधानावर कडाडून टीका केली असून त्यांचे क्रेमलिनशी असलेले जवळचे संबंध आणि अमेरिकेचे प्रमुख म्हणून दिलेल्या उत्तरावर सवाल उभे केले आहेत.

३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेटवरील नियंत्रण गमावले असून तिथे डेमोक्रॅट्सने बाजी मारली आहे. त्यामुळे पक्षाचे राजकीय भवितव्य आणि ट्रम्प यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bondi Terror Attack: बाँडी बीच हल्ल्यातील हिरोंचं बहरलं प्रेम, जिथं वाचवले प्राण तिथंच अडकले विवाहबंधनात
Air India: एअर इंडियाला २२,००० कोटींचा फटका, पाकिस्तानचाही यात मोठा वाटा