
डिसेंबर २०२५ मध्ये बाँडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेतील दोन हिरो फर्स्ट रिस्पॉन्डर्स, जेम्स मॅकइंटोश आणि अलेक्झांड्रा एडमंडसन यांनी या दुःखातून सावरत आपल्या प्रेमाला नवी दिशा दिली आहे. त्यांनी २० नोव्हेंबर रोजी सिडनी मध्ये त्याच ठिकाणी जाऊन लग्नगाठ बांधली.
सोशल मीडियावर, विशेषतः एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात जेम्स आणि अलेक्झांड्रा आर्चर पार्कमध्ये लग्नाच्या शपथा घेताना दिसत आहेत. नॉर्थ बाँडी बीचजवळ असलेलं हे तेच ठिकाण आहे, जिथे १४ डिसेंबर २०२५ च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी अनेक पीडितांचे प्राण वाचवले होते.
या भावनिक सोहळ्याला तब्बल २०० पाहुणे उपस्थित होते. हा संपूर्ण किनारा तेव्हा जगभर चर्चेत आला होता, जेव्हा बाँडी बीचजवळ हनुक्का (Hanukkah) सणाच्या वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
सिडनीच्या पूर्व उपनगरात असलेल्या बाँडी बीचवर १४ डिसेंबर २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. हनुक्का सण साजरा करण्यासाठी सिडनीतील ज्यू समुदाय एकत्र आला असताना बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. यात १५ जणांचा बळी गेला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
त्याच वेळी जेम्स मॅकइंटोश आणि अलेक्झांड्रा एडमंडसन तिथेच जवळ होते. त्यांनी स्थानिक सर्फ क्लबमध्ये आठ आठवड्यांचा जीवरक्षक कोर्स नुकताच पूर्ण केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेचच पुढाकार घेत किनाऱ्यावरील जखमींवर प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली.
नाऊ टू लव्ह च्या रिपोर्टनुसार, हल्ल्याच्या रात्री जेम्स आणि अलेक्झांड्रा त्यांच्या एका मित्राच्या मास्टर्स डिग्रीचं सेलिब्रेशन करण्यासाठी भेटले होते. तेव्हाच त्यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना मदत केली, प्रथमोपचार दिले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत केली.
Two first responders who crossed paths during the Bondi Beach terror attack have returned to the site to tie the knot. It's an incredible love story born from one of the worst days in Australian history. https://t.co/jYc6NeYFoA
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) November 20, 2026
या दहशतवादी हल्ल्यानंतर जेम्स आणि अलेक्झांड्रा यांनी डिब्रीफिंग सेशन्सना एकत्र हजेरी लावली. या अत्यंत धक्कादायक घटनेतून सावरताना त्यांनी एकमेकांना खूप भक्कम साथ दिली. याच काळात त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये मेक्सिकोला सुट्ट्या घालवायला गेले असताना त्यांनी साखरपुडा केला.
बरोबर वर्षभरानंतर, हे दोन्ही फर्स्ट रिस्पॉन्डर्स बाँडी बीचच्या त्याच ठिकाणी परतले, जिथे त्यांनी अनेकांचे जीव वाचवले होते. तिथेच त्यांनी एकमेकांना जन्मभर साथ देण्याचं वचन दिलं. सेंट्रल सिनॅगॉग सिडनीचे रब्बी लेवी वोल्फ यांनी नोहाइड (Noahide) प्रथेनुसार त्यांचा विवाह लावून दिला. ही प्रथा वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करते.
बाँडी बीच परिसरातील हा विवाह सोहळा खूपच भावुक करणारा होता. या हल्ल्यातून वाचलेले लोक, पीडितांचे कुटुंबीय आणि जीवरक्षक या लग्नाला उपस्थित होते. नवदाम्पत्य अलेक्झांड्रा आणि जेम्स यांनी या वाईट आठवणींवर मात करून नवीन सुरुवात केल्याबद्दल खूप आनंद व्यक्त केला.
अलेक्झांड्राने या दिवसाला ‘अविश्वसनीय’ म्हटलं आहे. तिने सांगितलं की हा सोहळा तिच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने सुंदर होता. ज्या ठिकाणी त्यांनी लोकांचे प्राण वाचवले, तिथेच त्यांच्या प्रेमाचा उत्सव साजरा करणं त्यांच्यासाठी खूप खास होतं. दोघेही ज्यू नसताना त्यांनी नोहाइड परंपरेनुसार लग्न का केलं, याबद्दलही तिने आपले विचार मांडले.
“ते खरोखरच अविश्वसनीय होतं. माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त. तो क्षण खूप सुंदर होता.” - द सिडनी हेराल्डशी बोलताना अलेक्झांड्रा
“मला वाटतं, यहुदी धर्माची मूल्यव्यवस्था खूप सुंदर आहे - ते जीवन, कुटुंब आणि समाज खूप चांगल्या प्रकारे जपतात,” ती पुढे म्हणाली.
दरम्यान, हे जोडपं पुढच्या महिन्यात बाँडी येथे होणाऱ्या श्रद्धांजली कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ते हनिमूनला जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यानंतर त्यांना आपलं कुटुंब वाढवायचं आहे.
हे पण वाचा: क्रूझ शिपवरील शेफ हजारो प्रवाशांसाठी डेझर्ट कसं बनवतात? पाहा हा व्हायरल व्हिडिओ (WATCH)